Leopard Attack : बिबट्याचा हल्ला; पत्नीने वाचविले पती व मुलीचे प्राण

मलंगगडच्या पायथ्याशी बिबट्याचे दर्शन
leopard attack
leopard attacksakal

डोंबिवली : कल्याणमधील काटेमानिवली नंतर आता मलंगगडच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीत बिबट्याने शिरकाव करत एका कुटुंबावर हल्ला चढविला. बिबट्याचा हल्ला होताच पवार कुटुंबातील रणरागिणी सखू यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता हातात काठी घेऊन त्याला घरातून हुसकावून लावत पती व मुलीची बिबट्याच्या हल्ल्यातून सुखरूप सुटका केली.

आदिवासी पाड्यात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वन विभागाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याचा शोध सुरू केला आहे. कल्याण मधील काटेमानिवली परिसरात दोन महिन्यांपूर्वी बिबट्या आला होता. चार ते पाच जणांवर हल्ला केल्यानंतर त्याला जेरबंद करण्यात वन विभागास यश आले होते. मलंगगड परिसरातून हा बिबट्या आला असल्याची शक्यता त्यावेळी वर्तविण्यात आली होती.

मलंगगड परिसरात बिबट्याचा अधिवास वाढत असल्याचे देखील बोलले जात आहे. असे असतानाच गुरुवारी मध्यरात्री मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या जकात नका परिसरातील एका कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. जकात नाका भागात पप्प्या बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह राहतात.

शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपलेलं असताना अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला चढवला. या गोंधळाने सखुबाई यांना जाग आली. बिबट्याला समोर पाहून त्यांनी लगेच लहान मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिमतीने प्रतिकार केला आणि बिबट्याला पळवून लावल आहे.

मात्र या दरम्यान बिबट्याशी झालेल्या झटापटीत पप्या हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्याच्या चेहऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या आहेत.

काही दिवसांवर मलंगगड यात्रा आली आहे. यात्रेच्या कालखंडात कोणत्याही प्रकारची घटना घडू नये यासाठी घटनेची माहिती मिळताच वन विभागाने बदलापूर विभागीय अधिकारी विवेक नातू, वन विभागाचे मलंगगड मंडळ अधिकारी विठठल दरेकर, यांसह हिललाईन पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक करडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ यांनी घटनास्थळी भेट देत वन विभागला योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यात्रेच्या तोंडावर बिबट्याचे आगमन

दरवर्षी मलंगगड यात्रेच्या प्रारंभाला बिबट्याचे दर्शन हे मलंगगड भागात होत असते. मात्र आतापर्यंत बिबट्याने नागरिकांवर कधी हल्ला केला नव्हता. यंदा मलंगगड यात्रेच्या प्रारंभालाच मलंगगडाच्या पायथ्याशी बिबट्याने दर्शन दिले आहे. त्यामुळे वन विभाग देखील कामाला लागले आहे. आदिवासी पाड्यातील नागरिकांवर हल्ला करणारा बिबट्या आहे याची पुष्टी अद्याप बन विभागाने दिलेली नाही. सध्या वन विभागाच्या वतीने जनजागृती करण्याविषयी सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com