कर्जतमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ

हेमंत देशमुख : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

कर्जत तालुक्‍यातील अंभेर पाडा परिसरात आज पहाटे हिंस्र पाण्याच्या हल्ल्यांत 12 बकऱ्या आणि एका वासराचा मृत्यू झाला. हा हल्ला बिबट्याने केला की वाघाने, याबाबत वनाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे; मात्र ग्रामसेवकाने सादर केलेल्या अहवालात हा हल्ला दोन ते तीन बिबट्यांनी केल्याची शक्‍यता वर्तवली आहे. 

कर्जत : कर्जत तालुक्‍यातील अंभेर पाडा परिसरात हिंस्र पाण्याच्या हल्ल्यांत 12 बकऱ्या आणि एका वासराचा मृत्यू झाला. हा हल्ला बिबट्याने केला की वाघाने, याबाबत वनाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे; मात्र ग्रामसेवकाने सादर केलेल्या अहवालात हा हल्ला दोन ते तीन बिबट्यांनी केल्याची शक्‍यता वर्तवली आहे. 

अभेर पाडा ग्रामपंचायतीमधील बेलाची वाडी येथील प्रकाश पारधी यांच्या या मृत बकऱ्या आणि वासरू आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गोठ्यात घुसून हिस्र प्राण्यांनी बकऱ्या आणि वासरावर हल्ला केला. 

या घटनेची माहिती पूर्व विभागाचे वन क्षेत्रपाल सोनल वळवी यांना मिळाल्यानंतर त्यांनी वाडीवर पाहणी करून पंचनामा केला; मात्र हा हल्ला वाघाने केला की बिबट्याने, याबाबत वनाधिकाऱ्यांमध्ये साशंकता आहे. या घटनेमुळे पारधी यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे; तर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट आहे. कर्जत तालुक्‍यात वाघ आणि बिबट्याचा वावर असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले आहे. 

बेलाची वाडी येथील शेतकऱ्यांच्या जनावरांच्या मृत्यूबाबत ग्रामसेवक सुधीर लोहकरे यांनी कर्जत पंचायत समितीकडे अहवाल सादर केला आहे. याममध्ये त्यांनी बिबट्याच्या हल्ल्यात 12 बकऱ्या आणि गाईच्या वासराचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. हा हल्ला मोठा असल्याने तो दोन ते तीन बिबट्यांनी केला असल्याची शक्‍यता वर्तविली आहे. 

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. 
- अविनाश कोष्टी, तहसीलदार, कर्जत 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard in Karjat