बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठ्याची आशा धूसर?

शर्मिला वाळुंज
बुधवार, 24 जुलै 2019

अतिरिक्त क्षमतेनुसार बारवी धरणात आतापर्यंत केवळ ४४.४८ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचाही जोर हवा तसा नसल्याने यंदा धरण शंभर टक्के भरेल का, याविषयी साशंकता आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहरांना वाढीव पाणीपुरवठ्याचे आशास्थान असणाऱ्या बारवी धरणाचे पूर्ण विस्तारीकरण होऊन या वर्षी धरणात अतिरिक्त पाणीसाठा करण्याची पूर्ण तयारी प्रशासनाने केली; परंतु प्रशासनाच्या या सर्व मेहनतीवर पावसाने पाणी फेरले असून अतिरिक्त पाणीसाठ्याची आशा धुसर होत चालल्याचे दिसून येत आहे. अतिरिक्त क्षमतेनुसार बारवी धरणात आतापर्यंत केवळ ४४.४८ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाचाही जोर हवा तसा नसल्याने यंदा धरण शंभर टक्के भरेल का, याविषयी साशंकता आहे.
 
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तीन टप्प्यांत धरणाची उंची वाढविण्याचे काम तब्बल १७ वर्षांनी पूर्ण केले. २०१२ मध्ये दुसऱ्या टप्प्यातील धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण करण्यात आले. सांडव्याचे काम झाल्याने धरणाची उंची तीन मीटरने वाढून ६८.६० मीटर झाली. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा १८१ द.ल.घ.मी.वरून २४० दलघमी झाला. त्यानंतर बारवी धरणावर अकरा वक्र दरवाजे बसविण्यात आले. दरवाजे बसविल्यामुळे धरणाची उंची ७२.६० मीटर होऊन पाणीसाठवण क्षमता ३४०.४८ दलघमी होणार आहे; परंतु प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असल्याने धरणात अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. 

धरणाची उंची वाढवूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नसल्याने यावर तोडगा म्हणून पावसाळ्याआधी प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश सरकारने एमआयडीसीला दिले होते. त्यामुळे धरणात अतिरिक्त पाणीसाठा होण्याचा मार्ग मोकळा झाला होता; मात्र त्यावर पावसाने पाणी फेरत ही आशा धुसर केली आहे. बारवी धरणात आतापर्यंत उंचीनुसार ६८.६० मीटर (६४.६७ टक्के) पाणीसाठा आहे; तर धरणाच्या वाढीव ७२.६० मीटर उंचीनुसार ४४.४८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

पावसावर सारे काही अवलंबून
बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १३६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी २० जुलैदरम्यान बारवी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामानाने यंदा २३ जुलैपर्यंत ६४.६७ टक्केच धरण भरले आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत धरण शंभर टक्के भरते; परंतु यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने अद्याप जुन्या उंचीनुसार धरण शंभर टक्केही भरले नसल्याचे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. या वर्षी धरणात अतिरिक्त पाणीसाठा करण्यात येणार होता; परंतु पावसावर सारे काही अवलंबून असून अतिरिक्त पाणीसाठा यंदा होतो की नाही, याविषयी शंका असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: less Chances of additional water storage in Barvi Dam