रस्ता सुरक्षेचे चार हजार विद्यार्थांना धडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

खारघर - रस्ते अपघातात देशात १८ ते ३० वयोगटातील तरुणांचे अधिक प्रमाण असल्याने खारघरमधील ‘युवा सेंटर’ या सामाजिक संस्थेने गेल्या वर्षभरात नवी मुंबई परिसरातील महापालिका आणि खासगी शाळेतील जवळपास चार हजार विद्यार्थांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले आहे.

खारघर - रस्ते अपघातात देशात १८ ते ३० वयोगटातील तरुणांचे अधिक प्रमाण असल्याने खारघरमधील ‘युवा सेंटर’ या सामाजिक संस्थेने गेल्या वर्षभरात नवी मुंबई परिसरातील महापालिका आणि खासगी शाळेतील जवळपास चार हजार विद्यार्थांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले आहे.

मुंबई तसेच नवी मुंबई परिसरातील नाका कामगार, तसेच झोपडपट्टी परिसरातील नागरिकांच्या विविध प्रश्‍नांवर युवा संस्था काम करते. देशात रस्ते अपघातात तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने उद्याचे भावी नागरिक असलेल्या विद्यार्थांना शालेय जीवनात रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्याचा ध्यास घेऊन या संस्थेने ‘मिशन सलामत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्रथम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना रस्ते अपघात आणि त्यावर उपाय या विषयांवर प्रशिक्षण दिले गेले. गेल्या दहा महिन्यांत नवी मुंबईतील महापालिका, तसेच खासगी शाळेतील जवळपास चार हजार विद्यार्थांना या संस्थेने रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले आहे. यासाठी शाळा, महाविद्यालय, विविध मॉल्स, बस आणि रेल्वेस्थानके, नाका कामगार, तसेच वर्दळीच्या ठिकाणावर पथनाट्यातून मार्गदर्शन करण्यात आले. या संस्थेचे सदस्य सध्या नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी २३ एप्रिल ते ५ मे दरम्यान हाती घेतलेल्या रस्ता सुरक्षा अभियानात सहभागी होताना विविध ठिकाणी पथनाट्यातून मार्गदर्शन करत आहेत. 

निबंध व चित्रकला स्पर्धा
या युवा सेंटरने शनिवारी (ता. २८) खारघर सेक्‍टर ७ मधील युवा सेंटरच्या सभागृहात नवी मुंबईतील टाटानगर, बेलापूर, दुर्गामाता झोपडपट्टी, संभाजी नगर आणि पंचशील नगरमधील जवळपास शंभर शालेय मुलांची रस्ता सुरक्षेविषयी निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेतली होती. या माध्यमातून या स्पर्धकांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात आली.

Web Title: Lessons of four thousand students of road safety