'त्यांना' आमच्या घरी येऊ द्या! ज्येष्ठांची परवानगीसाठी सोसायटीकडे आर्जव

senior citizen
senior citizen

ठाणे : कोरोनाचा शिरकाव आपल्या सोसायटीत होऊ नये यासाठी अनेक सोसायट्यांनी लॉकडाऊनची घोषणा होताच सोसायटीमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेश बंदी केली. घरकामास येणाऱ्या महिलांनाही बंदी घालण्यात आली. लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून, हा कालावधी आणखी किती वाढेल याची शाश्वती नसल्याने काही ज्येष्ठ नागरिक, एकल नागरिक यांनी आमच्या घरी कामगार महिलेस येऊ द्या, अशी परवानगी सोसायट्यांकडे मागण्यास सुरुवात केली आहे. वय झाल्याने घरकाम होत नाही. घरकाम करू परंतु जेवण बनविता येत नाही, अशा अनेक समस्या ज्येष्ठ नागरिकांना भेडसावत असून, त्यांनी आपली व्यथा सोसायटी कमिटीकडे मांडण्यास सुरुवात केली आहे. 

मार्चमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला आणि लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. कोरोना संसर्गाचा प्रसार वाढू नये म्हणून शहरातील सोसायट्यांनी त्वरित पावले उचलत सोसायटीसाठी काही कडक नियम आखून त्याची अंमलबजावणी सुरू केली. सोसायटीमध्ये येण्यास स्वच्छतादूत, दूध-भाजी विक्रेता यांनाच केवळ परवानगी देण्यात आली. घरकाम करणाऱ्या महिला, नातेवाईक, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यांना सोसायटीत प्रवेशबंदी करण्यात आली. सोसायटीतील नागरिकांनाही केवळ काही तासांसाठी बाहेर पडण्यास परवानगी देण्यात येते. असे वेगवेगळे नियम सर्वच सोसायट्यांनी घालून घेतले असून, नागरिकही त्याचे पालन करीत आहेत; परंतु यामध्ये सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. मुले बाहेरगावी असल्याने काही घरात केवळ ज्येष्ठ नागरिक राहत आहेत. त्यातही काही एकल आहेत, कोणी अंथरुणाला खिळलेले आहे, अशा अनेक समस्या आहेत. अशा नागरिकांना आजूबाजूचे नागरिक मदत करीत असले तरी किती दिवस मदत करणार, हाही प्रश्न आहे. 

मुलगा बाहेरगावी असल्याने येथे आम्ही दोघेच राहतो. आमचे वय आता 70 च्यापुढे आहे. आजूबाजूचे नागरिक बाहेरून काही सामान आणून देण्यात मदत करतात; परंतु घरातील कामे, जेवण हे प्रश्न आहेतच. वयामुळे ते काम होत नाही. दोन महिने कसे तरी काम केले. आता झेपत नाही. त्यामुळे आम्ही सोसायटीकडे घरकामास येणाऱ्या महिलेला येऊ द्यावे, अशी विनंती केली आहे. सोसायटीमध्ये येताना सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे व इतर काळजी ती घेईल, परंतु तिला येऊ द्यावे ही विनंती आहे. 
- सदाशिव जोशी, रहिवासी, अंबिकाधाम सोसायटी

गेली कित्येक वर्षे एकटा राहत आहे. घरचे काम मीच करतो, परंतु जेवण बनविण्यासाठी महिला येते. या लॉकडाऊनमुळे तिला सोसायटीत प्रवेशबंदी केली होती. त्यादरम्यान बाजूच्या काही लोकांनी मदत करत एक एक दिवस पोळी दिली, मी भाजी जमेल तशी बनवत होतो किंवा मग भात करून खायचो. परंतु, आता लॉकडाऊन वाढतच असल्याने मी सोसायटीकडे जेवण बनविणाऱ्या महिलेला घरी येऊ दिले जावे अशी मागणी केली. सोसायटीने परवानगी दिली आहे. इतर लोकांच्या घरी जाण्यास तिला परवानगी नाही, केवळ ज्या ज्येष्ठांना गरज आहे, त्यांच्याघरी जाऊन ती सध्या काम करते. 
- रतन छेडा, रहिवासी, त्रिवेणीधारा सोसायटी

Let them come to our house Affordability of senior citizens due to age in Thane

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com