Mumbai News : परवानाविनाच तळीरामांचे सुसाट मद्यपान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

license required to drink purchase and carry alcohol Violation of rules of State Excise Department mumbai

Mumbai News : परवानाविनाच तळीरामांचे सुसाट मद्यपान

मुंबई : राज्यातील परमीट रुम, रेस्टाॅरंट, क्लब यासारख्या ठिकाणी मद्यपिणे, खरेदी किंवा सोबत बाळगण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार परवाना लागतो. परवाना नसल्यास संबंधीत व्यक्तीवर अदखपात्र गुन्हा दाखल आणि आर्थिक दंडाची तरतुद आहे.

त्यासाठी एक वर्षांसाठी आणि आजीवन असे दोन प्रकारचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून काढता येतात, मात्र, या परवानाबाबत तळीरामांमध्ये जनजागृतीच नसल्याने मुंबईसह राज्यभरातील मद्यविक्रीची आकडेवारी बघता मद्यपिण्याचा परवाना काढण्याचे प्रमाण अल्प असल्याचे पुढे आले आहे.

मद्यपान, मद्य विक्री किंवा मद्य खरेदी केल्यानंतर मद्याच्या बाटल्या सोबत बाळगण्यासाठी मद्य पिण्याचा परवाना लागतो. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आॅनलाईन सेवा सुरू केली आहे. 100 रूपये शुल्क भरून एक वर्षांसाठी मद्य पिण्याचा परवाना मिळतो,

तर 1000 रूपये शुल्क भरून आजीवन मद्य पिण्याचा परवाना दिला जातो. हा परवाना असल्यास मद्यपान, मद्य खरेदी आणि मद्य सोबत बाळगण्याची कारवाई टाळता येणार नाही. मात्र, परवानाविनात तळीरामांकडून मद्याचे घोट रिचवले जात आहे.

त्याशिवाय परवाना नसलेल्या व्यक्तीस मद्यविक्री करणे सुद्धा गुन्हा आहे. त्यासाठी 25 हजार ते 30 हजार रुपये दंड होऊ शकतो. मात्र, यासंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गंभीरपणे तपास केला जात नसून, विनापरवाना मद्य पिण्याचे प्रमाण आणि परवाना नसलेल्यांना मद्य विक्रीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, यावर कुठेही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.