Mumbai : वाशीतील वाहतूक कोंडीत जीव घुसमटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vashi

वाशीतील वाहतूक कोंडीत जीव घुसमटला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : महापालिकेतर्फे वाशीतील एनएमएमटी बस डेपोच्या जागेवर भव्य वाणिज्य संकुल उभारण्यात येत आहे. त्यामुळे बस डेपोत येणाऱ्या बस सायन-पनवेल महामार्गावरील वाशी बसस्थानक आणि अंतर्गत रस्त्यांवरून ये-जा करू लागल्या आहेत. यात एसटी महामंडळाच्या आणि खासगी वाहनांची भर पडत असल्याने वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास रहिवाशांना होत आहे. या समस्यांवर तत्काळ तोडगा न काढल्यास वाशीतील प्रदूषण नियंत्रणाबाहेर जाईल, अशी भीती पर्यावरणवादी संघटनांकडून करण्यात येत आहे.

एनएमएमटी प्रशासनाला आर्थिक उभारी देण्यासाठी एनएमएमटीच्या डेपोच्या जागेवर २१ मजली वाणिज्य संकुल उभारण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील एनएमएमटीचे डेपो बंद करण्यात आले आहे.

डेपोतून ११ मार्गांवर एनएमएमटीच्या ७५ पेक्षा जास्त बस दिवसभरात धावतात. तर बेस्टच्याही सुमारे ६० पेक्षा जास्त बस विविध मार्गावर धावतात. डेपोअभावी भावे नाट्यगृहासमोरून, सागर विहार मार्गे, वाशी रेल्वे स्थानक बस थांबा आणि शीव-पनवेल महामार्गावरील वाशी बस थांब्यावरून प्रवासी घेतात. या बस व्यतिरिक्त एसटी, बाहेरगावाहून येणाऱ्या इतर प्रवासी बस आणि खासगी बस अशा अवजड वाहनांसोबत स्थानिक वाहनांचीही भर पडते. त्यामुळे एरवी वेगवेगळ्या मार्गांवर धावणारी वाहने एकाच वेळेस एकाच स्थानकांवर येण्याचे प्रमाण वाढल्यामुळे वाशी शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. \

वाहनांचे हॉर्नमुळे येणारा आवाज, धुरातून उर्त्सजित होणारे वायू अशा घटकांचे प्रमाण वाढीस लागण्याची भीती नेटकनेक्ट फाऊंडेशनतर्फे वर्तवली आहे.

वाहनतळाबाबत नियोजनाच्या सूचना

वाशीत होणाऱ्या भव्य वाणिज्य संकुलामुळे भविष्यात येणाऱ्या अडचणींबाबत पालिकेला अवगत करण्यासाठी नेटकनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीत कुमार यांनी संकुलाशी निगडित शक्य आपत्तीविषयी संभाव्य धोके सांगितले. याठिकाणी विस्तारित मार्ग, गमन मार्गिका, आपत्तीबाबत माहिती दिली. संकुलात येणाऱ्या बसचे आगमन आणि बाहेर जाण्याचा मार्ग पाहता वाहनतळांचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या.

...तर वाहनांच्या रांगा लागणार

वाणिज्य संकुलात महापालिकेने पुरेशा वाहनतळांची व्यवस्था आणि त्याचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे. बहुतांश संकुलांबाहेरच्या रस्त्यांवर नागरिक वाहने उभी करून जातात. अशी परिस्थिती वाशीच्या संकुलाबाहेर झाली तर जवळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतील अशी शक्यता नेट कनेक्ट फाऊंडेशनतर्फे वर्तविण्यात आली.

loading image
go to top