
मुरूड-शेगवाडा येथील साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी रात्री उशिरा आढळून आलेल्या सव्वाचार फुटी घोणस सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले.
अलिबाग : मुरूड-शेगवाडा येथील साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी रात्री उशिरा आढळून आलेल्या सव्वाचार फुटी घोणस सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र संदीप घरत यांनी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडून त्याला जीवदान दिले.
शहरातील शेगवाडा साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी रात्री उशिरा १० वाजता सव्वाचार फुटी घोणस साप आढळून आला. त्याला काही जण मारण्याच्या तयारीत असताना त्या ठिकाणी शिवसैनिक रूपेश पाटील पोहोचले. सव्वाचार फुटी घोणस सापाला न मारण्याचे सांगून सर्पमित्र घरत यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पाचारण केले. त्यांनी वेळ न दवडता तातडीने घटनास्थळी येत घोणस जातीच्या सापाला सुरक्षितपणे पकडून दुसऱ्या दिवशी मुरूड वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गारंबी जंगलात सोडून जीवदान दिले.