लघवीच्या नमुन्यासाठी जीव धोक्‍यात 

शुभांगी पाटील 
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

तुर्भे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत अभियानासाठी आग्रही असताना नवी मुंबई महापालिकेच्या पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृहांची दारे महिला रुग्णांसाठी बंद करण्यात आली आहेत. या संतापजनक प्रकारामुळे महिला रुग्णांना लघवीच्या नमुन्यासाठी रस्ता ओलांडून समोरच्या स्मशानभूमितील स्वच्छतागृहात जावे लागते. भरधाव वाहनांमुळे रस्ता ओलांडणे धोक्‍याचे ठरत असून काही महिलांना स्मशानभूमीत जाण्यास भीती वाटत असल्याने त्यांना अखेर झाडाचा आडोसा घ्यावा लागत आहे. 

पावणे गावातील पावणेश्‍वर नागरी आरोग्य केंद्रात स्वच्छतागृह असले तरी ते डॉक्‍टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठीच खुले ठेवण्यात आले आहे. लघवीच्या नमुन्यासाठीही त्याचा रुग्णांना वापर करण्यास मनाई आहे. याबाबत महिलांनी विचारणा केल्यास तेथील कर्मचारी जवळच्या स्मशानभूमितील स्वच्छतागृहाकडे बोट दाखवून मोकळे होतात. अशा वेळी गर्भवतींना मोठी पायपीट करावी लागते. स्मशानभूमी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्यामुळे ही पायपीट धोकादायक ठरते. कधी कधी अंत्यविधी सुरू असतानाही त्यांना या स्वच्छतागृहात जावे लागते. 

राज्यातील श्रीमंत महापालिका आणि स्वच्छ भारत अभियानात दोन वेळा देशात अव्वल ठरलेल्या शहरातील नागरी आरोग्य केंद्रात महिला रुग्णांना दिल्या जाणाऱ्या या संतापजनक वागणुकीमुळे निषेध होत आहे. 

महिलांची फरपट 
तुर्भे येथील माता बाल रुग्णालय बंद असल्याने बहुतांश महिला रुग्ण पावणे येथील नागरी आरोग्य केंद्रात जावे लागत आहे. महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने त्यांना या ठिकाणी उपचार घ्यावे लागतात. 

पावणे रुग्णालयात स्वच्छतागृह असतानाही स्मशानभूमितील स्वच्छतागृहात जाण्याचा सल्ला दिला जातो. हे संतापजनक असून दोन दिवसांपूर्वी माझ्या नातेवाईकांना घेऊन गेले होते, त्यावेळी हा प्रकार पाहण्यास मिळाला. नवी मुंबई पालिकेकडून अशा अपेक्षा नाहीत. 
- रुपाली पुजारी, रुग्णाची नातेवाईक 

रुग्णालयातील स्वच्छतागृहाचा वापर करण्यास मनाई करणे हे नवी मुंबई महापालिकेला शोभनीय नाही. महिलांना अशा प्रकारे उघड्यावर जावे लागत असेल, तर पालिकेने केलेला खर्च वाया गेला. याचा जाब प्रशासनाला विचारला जाईल. लवकरात लवकर सुधारणा करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. 
- सुजाता पाटील, सभापती, महिला व बालकल्याण समिती 

नागरी आरोग्य केंद्रातील स्वच्छतागृह हे सर्वांसाठी खुले ठेवले पाहिजे; मात्र महिलांना स्वच्छतागृहात जाण्यास कोणी अडथळा आणत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. स्वच्छतागृहे ही फक्त डॉक्‍टरांसाठी नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. 
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, नवी मुंबई महापालिका 

Web Title: Life threatens urine samples