पनवेलमध्ये दारूबंदी?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

राज्यातील पालिका आणि महापालिकांसमोर कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची योजना आघाडीकडे आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी बहुमजली पार्किंग झोन तयार करणार आहोत. 
- बाळाराम पाटील, आमदार.

पनवेल - खारघर वासाहत दारूमुक्त आहे. उलव्यातही संघर्ष करून दारू हद्दपार करण्यात आली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रही दारूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत असून महापालिकेत आघाडीची सत्ता आल्यानंतर एकाही नवीन मद्यविक्री दुकानाला परवानगी देणार नाही, अशी ग्वाही आज माजी आमदार आणि शेकापचे नेते विवेक पाटील यांनी दिली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांची पनवेलच्या विकासासंदर्भातील भूमिका जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक  संघात ‘व्हिजन पनवेल महापालिका’ हे चर्चासत्र झाले. त्या वेळी ते बोलत होते.डान्स बार बंदी केली. आता पनवेल दारूमुक्त करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या कायद्याचा अभ्यास करत आहोत, असे पाटील यांनी सांगितले. 

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वाहतूक आदी मूलभूत प्रश्न दहा वर्षांत सत्तेत असूनही विरोधकांना सोडवता आले नाहीत. आघाडीकडे मात्र हे प्रश्न सोडवण्यासाठी नियोजन आहे. मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असताना शिक्षणाकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये सीबीएससी अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महापालिकेच्या विकासासाठी आघाडी सर्व प्रकारचे प्रयत्न करणार आहे. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्याची कल्पना हा त्याचाच भाग आहे. नवी मुंबई महापालिकेचे स्वतःचे धरण आहे. त्यामुळे या शहरात पाणी प्रश्न नाही. 

नवी मुंबईच्या पावलावर पाऊल टाकून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पनवेल महापालिकेचे देहरंग धरणातील गाळ काढणे, उंची वाढवण्याबरोबर या धरणाच्या वर आणखी एक धरण बांधण्याची योजना आहे. तळोजा ग्रामपंचायतीचे धरण आहे. त्या धरणाचा ताबा घेण्यात येणार असून अन्य दोन-तीन ठिकाणी नवीन धरणे बांधण्याची योजना आहे, असे पाटील यांनी सांगितले. 

Web Title: Liquor ban in panvel