बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवार याद्यांना दिरंगाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. मात्र, शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेसने सावध पावले टाकायला सुरवात केली असून, बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडून उमेदवाऱ्यांच्या याद्या जाहीर करण्याऐवजी शेवटच्या दिवशी एबी फॉर्म देण्याचा मार्ग स्वीकारला जाईल, अशी शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन पक्षाने मुंबई महापालिकेसाठी तब्बल 30 जागांची मागणी भाजपकडे केल्याने भाजपची अडचण झाली असून, त्यामुळे यादी जाहीर होण्यास दिरंगाई होत आहे. 

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचे तीन दिवस शिल्लक असतानादेखील शिवसेना आणि भाजपने तर अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत, तर कॉंग्रेसनेदेखील या दोन्ही पक्षांच्या चालीवर लक्ष ठेवून टप्प्याटप्प्यात यादी जाहीर करणे सुरू केले आहे. याविषयी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले, "सहा लोकसभा मतदारसंघांपैकी पाच लोकसभा मतदारसंघांतील आमचे उमेदवार निश्‍चित झाले आहेत. आज शेवटच्या मतदारसंघासाठी महत्त्वाची बैठक होणार असून, त्यानंतर भाजपची उमेदवारांची यादी निश्‍चित होणार आहे.' 

शिवसेना, भाजप, कॉंग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोर होण्याची भीती पक्षातील वरिष्ठांना वाटते आहे. त्याचमुळे या तिन्ही पक्षांनी अद्याप उमेदवारांची नावे गोपनीय ठेवली आहेत. शिवसेनेला रिपब्लिकन जनशक्‍ती संघटनने पाठिंबा दिला असला तरी धनुष्यबाण या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याने त्यांची फार मोठी अडचण शिवसेनेला भासणार नाही. मात्र, घटक पक्षांमुळे भाजपची कोंडी झाली आहे. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपकडे मुंबई महापालिकेसाठी 30 जागा मागितल्या आहेत, तर मंत्रिमंडळात वर्णी लागलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनीदेखील मुंबईत जागा मिळाव्यात, अशी गळ घातली आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय होत नसून सर्व घटक पक्षांना केवळ 20 जागा देण्याची भूमिका मुंबई भाजपने घेतल्याचे समजते. 

Web Title: lists delay for Rebel candidate