याद्यांमधून छायाचित्रे गायब

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

छायाचित्रांसह यादी संकेतस्थळावर अपलोड होताना अनंत अडचणी येत आहेत...

ठाणे - निवडणुकीचे काम जास्तीत जास्त अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. यात तांत्रिक अडचणींचा अडथळा येत असून, मतदारांची यादी देताना अद्याप त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. ३ फेब्रुवारीनंतर छायाचित्रांसह यादी अपलोड करण्यात येणार असल्याचा दावा पालिकेच्या निवडणूक विभागाने केला आहे.

पालिकेच्या निवडणुका २१ फेब्रुवारीला होणार आहेत. त्यानुसार चार प्रभागांचे एक पॅनेल असल्याने प्रभागात कोणकोणता भाग आहे, त्या ठिकाणी कोण मतदार आहेत, याची माहिती मिळविण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्या हाती घेतल्या आहेत; परंतु याद्यांवर आणि पालिकेच्या वेबसाईटवर असलेल्या याद्यांवर मतदात्याचे छायाचित्रच नसल्याचे उघड झाले आहे. छायाचित्रासह यादी अपलोड करताना ती हेवी होत असल्याने उशीर होत असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

ठाणे पालिका निवडणुकीत आघाडी झालेली असून, युतीमध्ये काडीमोड झाला आहे. त्यामुळे शेकडो उमेदवार हे निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. पालिकेकडूनही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जात असून, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे.

विकत घेतलेल्या याद्यांचे करायचे काय?
प्रभागातील किमान २० हजारांपासून ४० हजार मतदारांपर्यंत उमेदवारांना पोहचायचे आहे. अशा वेळी जास्तीत जास्त चेहऱ्यांची तोंडओळख होऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा अंदाज उमेदवारांना बांधायचा आहे. पालिकेने छापलेल्या अनेक याद्यांमध्ये मतदात्यांची छायाचित्रे नसल्याने विकत घेतलेल्या या याद्यांचे करायचे काय, असा प्रश्‍न अनेक उमेदवारांना पडला आहे.

Web Title: Lists of missing photographs