डोंबिवलीत 3 ते 5 फेब्रुवारीला सारस्वतांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नोटाबंदीचेही पडसाद
संमेलनात सात परिसंवाद होतील. नोटा बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर 'बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठीलेखन' यावरही परिसंवाद होईल. याशिवाय 'ग्रामीण स्त्री : वास्तवातील आणि साहित्यातील', ' पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता', 'साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व', 'आम्हीच मराठीचे मारेकरी!', 'मराठी समीक्षेची समीक्षा', 'विविध साहित्य प्रवाहांची सद्यस्थिती', या विषयांवरही परिसंवाद होतील.
....

कल्याण : डोंबिवलीत होणारे 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत होईल. या संमेलनात कवी संमेलने, परिसंवाद, प्रकट मुलाखती तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशी मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत या संमलनाची रूपरेषा जाहीर केली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे, महामंडळाचे पदाधिकारी तसेच आयोजन संस्थेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. पारंपरिक दिंडीने सुरवात होणाऱ्या संमेलनात निमंत्रित कवींची दोन कवी संमेलने होतील. कवी कट्टा, प्रकाशन मंचचा संमेलनात समावेश असेल. उद्‌घाटन सोहळ्यात संमेलनाध्यक्षांना भाषणासाठी कमी वेळ मिळतो, हा अनुभव लक्षात घेता संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या भाषणावर चर्चा होईल.
बालवाचकांसाठीच्या लेखनाचे काय झाले, यावर विचारमंथन करण्यासाठी या संमेलनात बालकुमार मेळावा होईल. त्यात स्थानिक कलाकार बालकांच्या प्रतिभाविश्वाचे सादरीकरण करतील. नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने संमेलनात त्यांच्यासाठीही मेळावा होईल. त्यात नवोदितांचे लेखन, अपेक्षा आणि आव्हाने यावर चर्चा तसेच नवोदितांचे कवी संमेलनही होईल.
या संमेलनात शोध युवा प्रतिभेचा या कार्यक्रमांतर्गत स्थानिक युवक-युवतींचा सहभाग असलेला 'आम्हालाही काही सांगायचेय' हा कार्यक्रम होईल. त्यात सहभागी होणारे त्यांच्या विषयांची निवड स्वतःच करतील. संमेलनात होणाऱ्या युद्धस्य कथा या कार्यक्रमांतर्गत सैन्य-पोलिस दलातील कथा तसेच विविध हल्ल्यांमध्ये दुःख भोगलेल्यांचे अनुभव तसेच त्यांच्या कथांचा समावेश असेल. स्थानिक बहुभाषिकांचा सहभाग या संमेलनात असावा, या हेतूने आंतरभारती संवाद हा कार्यक्रम होईल.
तीन प्रतिभावान व्यक्तींच्या मुलाखतींचा प्रतिभायन हा कार्यक्रमही संमेलनात होईल. तसेच कवी, कविता, काव्यानुभव या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात तीन कवितांचे सादरीकरणही होईल. त्याशिवाय दोन प्रकट मुलाखती व सांस्कृतिक कार्यक्रमही होतील. सांस्कृतिक कार्यक्रमात स्थानिक कलादर्शनाचा समावेश असेल.
...
नोटाबंदीचेही पडसाद
संमेलनात सात परिसंवाद होतील. नोटा बंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर 'बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन आणि मराठीलेखन' यावरही परिसंवाद होईल. याशिवाय 'ग्रामीण स्त्री : वास्तवातील आणि साहित्यातील', ' पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता', 'साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व', 'आम्हीच मराठीचे मारेकरी!', 'मराठी समीक्षेची समीक्षा', 'विविध साहित्य प्रवाहांची सद्यस्थिती', या विषयांवरही परिसंवाद होतील.
....
बोली भाषेतील कथाकथन
बोली भाषेतील कथाकथनाचा कार्यक्रम हा संमेलनाचा महत्त्वाचा भाग असेल. झाडी (विदर्भ), अहिराणी, मराठवाडी, कोकणी, कोल्हापुरी, मालवणी आणि आग्री या भाषांतील कथा या वेळी सादर होतील.

Web Title: literary meet in dombivali