‘लिव्ह इन’मध्ये जन्मलेल्या मुलीची ‘डीएनए’ करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High Court Order

‘लिव्ह इन’मध्ये जन्मलेल्या मुलीची ‘डीएनए’ करा

नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये जन्मलेल्या मुलीची आणि तिच्या आईची डीएनए चाचणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. एका अविवाहित आईने दाखल केलेल्या ‘हेबियस कॉर्पस’(बंदी प्रत्यक्षीकरण) याचिकेवर सुनावणी दरम्यान हा आदेश दिला.

या प्रकरणी न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, मुंबईत राहणारी ही महिला तिच्या जोडीदारासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. यादरम्यान तिने डिसेंबर २०१९ मध्ये एका मुलीला जन्म दिला. मार्च २०२० मध्ये मुलगी तीन महिन्यांची असताना आईने तिला चंद्रपूर येथील एका कुटुंबाला दत्तक दिले. मुलगी परत मिळावी यासाठी या महिलेने चंद्रपूरच्या जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनादेखील निवेदन दिले. या प्रकरणी अधिकाऱ्याने सुनावणी घेतली. निर्णयानंतर, दोन कुटुंबीयांच्या वादात सापडलेल्या मुलीला एका सामाजिक संस्थेजवळ सांभाळण्यासाठी ठेवण्यात आले. यामुळे, महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

मुलीला जन्म देणारी आई (बायोलॉजिकल) आहे. त्यामुळे मुलीचा ताबा मलाच मिळावा, असा दावा तिने तिचे वकील अनिल ढवस यांच्यामार्फत केला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलेने डीएनए चाचणी करण्याची तयारीही दर्शवली. त्यानंतर, उच्च न्यायालयाने संबंधित पोलिस ठाणे, बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि संबंधित संस्थेला नोटीस बजावून उत्तरे मागितली आहे.

दोन वर्षांनंतर प्रेम जागृत

‘लिव्ह इन’मध्ये जन्म झाल्यानंतर काही कारणांमुळे मातेने जरी मुलीचा एकप्रकारे त्याग केला असला तरी तिला चिमुकलीची आठवण येत होती. तिला आता चिमुकलीशिवाय राहणे कठीण होऊ लागले. अशा परिस्थितीत मुलगी परत मिळवण्यासाठी तिने धडपड सुरू केली. मात्र, चंद्रपूरच्या कुटुंबीयांनी मूल परत करण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसांमध्ये धाव घेतली.

Web Title: Live In Relationship Couple Girl Born Dna Test High Court Order

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..