लोकल मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

घाटकोपरला मेट्रो स्थानकातील पत्रा ओव्हरहेड वायरवर; दादरमध्ये लोकलच्या पेंटोग्राफला आग

घाटकोपरला मेट्रो स्थानकातील पत्रा ओव्हरहेड वायरवर; दादरमध्ये लोकलच्या पेंटोग्राफला आग
मुंबई - मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी शनिवार मनस्तापवार ठरला. घाटकोपर येथे मेट्रो स्थानकाच्या भिंतीवरील पत्रा ओव्हरहेड वायरवर पडल्याने पहाटेपासून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली होती. त्यातच सायंकाळी दादर स्थानकात टिटवाळा लोकलच्या पेंटोग्राफला आग लागल्याने अनेक लोकल रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

घाटकोपर मेट्रो स्टेशन व मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्टेशनदरम्यान काही फुटांचे अंतर आहे. मेट्रोच्या स्टेशनच्या भिंतीवरील ऍल्युमिनियम पॅनेलचे (एसीपी) पत्रे पहाटे पाचच्या सुमारास ओव्हरहेड वायरवर कोसळले. त्यामुळे घाटकोपर येथे सकाळी 5.15 ते 5.45 पर्यंत अप व डाऊन मार्गावरील वाहतूक, तर कुर्ला स्थानकाजवळील वाहतूक 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला.
शनिवारी सायंकाळी 5.42 च्या सुमारास दादर स्थानकात टिटवाळ्याच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलच्या पेंटोग्राफमध्ये बिघाड झाला. ही लोकल
फलाट क्रमांक चारवर उभी असता पेंटोग्राफमधून धूर येऊ लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सायंकाळी 5.55 नंतर ही लोकल दुरुस्तीसाठी कुर्ला कारशेडला नेण्यात आली. त्यानंतर लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.

घाटकोपरमधील घटनेचा तपास मेट्रो कंपनी व एसीपी बसवण्याचे कंत्राट असलेले मे. शापूर्जी पालनजी व कंपनीमार्फत करण्यात येईल. घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काळजी घेण्यात येईल.
- प्रवक्ता, मुंबई मेट्रो वन प्रा.लि.

Web Title: local close