सिग्नल तोडून लोकल थेट दादर स्थानकात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - सीएसएमटी येथून टिटवाळ्याला जाणाऱ्या जलद लोकलच्या मोटरमनने सिग्नल तोडून लोकल पुढे नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता घडली. परिणामी मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील लोकल गाड्या दहा मिनिटे उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला.

सीएसएमटी येथून सिग्नल तोडल्यावर लोकल थेट दादर स्थानकात थांबली. त्या लोकलमध्ये ड्यूटीवर असलेल्या मोटरमनला तातडीने सेवेतून निलंबित करण्यात आले आणि लोकल पुढील तपासणीसाठी कुर्ला कारशेडमध्ये रवाना करण्यात आली. या घटनेची आम्ही चौकशी सुरू केली असून, येत्या काही दिवसांत त्याचा अहवाल उपलब्ध होईल, असे मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

मोठी दुर्घटना टळली
मशीद बंदर व सीएसएमटीदरम्यान सुविधा एक्‍स्प्रेसला सिग्नल देण्यात आला होता. मात्र, टिटवाळा लोकलच्या मोटरमनने त्याकडे दुर्लक्ष करत सिग्नल तोडून लोकल पुढे नेली. यादरम्यान दुसऱ्या रुळावरून येणारी सुविधा एक्‍स्प्रेस काही अंतरावर होती. त्यामुळे थोडक्‍यात मोठी दुर्घटना टळली.

महिन्यातील तिसरी घटना
मध्य लोहमार्गावर सिग्नल तोडल्याची मे महिन्यातील ही तिसरी घटना आहे. याआधी 14 मे रोजी बेलापूर लोकलच्या मोटरमनने कुर्ला येथे सिग्नल तोडला होता; तर 21 एप्रिलला विद्याविहार स्थानकात मोटरमनने सिग्नल तोडला होता.

Web Title: local dadar station