हॅड्रोलिक जॅकची महत्त्वाची कामगिरी

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

उल्हासनगर - विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाजवळ रुळावरून घसरलेल्या लोकलच्या पाच डब्यांना उचलण्यासाठी हॅड्रोलिक जॅकने महत्त्वाची कामगिरी बजावली. आठ जॅकच्या साह्याने डब्यांना जोडलेल्या रुळावर आणल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास लोकल अंबरनाथच्या दिशने रवाना करण्यात आली. तब्बल दहा तास विठ्ठलवाडी स्थानकात रूळ, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती सुरू होती.

उल्हासनगर - विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाजवळ रुळावरून घसरलेल्या लोकलच्या पाच डब्यांना उचलण्यासाठी हॅड्रोलिक जॅकने महत्त्वाची कामगिरी बजावली. आठ जॅकच्या साह्याने डब्यांना जोडलेल्या रुळावर आणल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास लोकल अंबरनाथच्या दिशने रवाना करण्यात आली. तब्बल दहा तास विठ्ठलवाडी स्थानकात रूळ, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती सुरू होती.
कुर्ला-अंबरनाथ लोकल पहाटे साडेपाचच्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकाजवळ पोहोचली. कल्याण स्थानक सोडल्यानंतर विठ्ठलवाडी स्थानक येईपर्यंत लोकलचा वेग कमी असतो. पहाटेची वेळ असल्याने लोकलमध्ये फारशी गर्दी नव्हती. स्थानक जवळ येत असतानाच तुटलेल्या रुळावरून लोकलचे डबे जाऊ लागले. सात डबे गेल्यानंतर मोटरमन महिपाल सिंह यांना स्लीपर्स तुटल्याचा आवाज आला, पाठोपाठ पाठीमागचे पाच डबे रुळावरून घसरले. गाडीचा वेग कमी असल्याने त्यांनी तातडीने ब्रेक्‍स लावून गाडी थांबवली. पाचही डबे रुळाजवळच घसरले होते. तातडीने नियंत्रण कक्षाला ही माहिती कळवण्यात आली. काही वेळातच कर्जतच्या दिशेने जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प झाली.

15 ते 20 मिनिटांत रेल्वेची मदत पथके विठ्ठलवाडी स्थानकाजवळ पोहोचली. घसरलेल्या डब्यांना रुळावर आणण्यासाठी अगोदर ओव्हरहेड वायरची जोडणी आवश्‍यक होती. त्याचवेळेस तुटलेले रूळ जोडण्याचे काम सुरू झाले. गॅंगमनच्या पथकाने प्रत्येक डब्याला आठ हॅड्रोलिक जॅक लावून ते वर उचलले. त्याला डॉमेटिक मशिनच्या साह्याने रुळांवर आणण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक डबा रुळावर आणण्यासाठी किमान एक तास खर्ची पडत होता. त्यामुळे वाहतूक पूर्ववत व्हायला वेळ लागला. रूळ, ओव्हरहेड वायर जोडणीसोबत वाकलेले खांबही सरळ करण्याचे दिव्य तरुण गॅंगमन पार पाडत होते. दुपारी दोनच्या सुमारास डबे रुळावर आणल्यानंतर अंबरनाथच्या दिशेने आणलेल्या इंजिनने ते कर्जतच्या दिशेने नेले.

बघ्यांची गर्दी
अपघाताची बातमी सोशल मीडियावरून व्हायरल होताच आसपास राहाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी विठ्ठलवाडी स्थानकाजवळ जमली. पहाटेच्या सुमारास अपघाताची माहिती सर्वत्र पोहोचल्याने अनेकांनी रस्ता मार्गे कल्याण गाठले. कर्जतच्या दिशेने जाणाऱ्यांना बदलापूरपर्यंत रस्ता मार्गे प्रवास करावा लागला.

Web Title: local derailed Vitthalwadi railway station

टॅग्स