ऐन लग्नसराईत प्रवाशांचे मेगा हाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

ब्लॉक संपल्यानंतर गर्दीचा महापूर
ब्लॉक संपल्यानंतरदेखील हार्बर मार्गावरील लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने प्रवाशांचे हाल झाले. हार्बरवर ब्लॉक काळात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष फेरी चालवण्यात आली खरी, मात्र कुर्ला स्थानकातच लोकल प्रवाशांनी खचून भरल्यामुळे अन्य स्थानकांत गर्दी सायंकाळपर्यंत जैसे थेच होती.

मुंबई - मध्य, हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक आणि कल्याण-कसारा मार्गावर विशेष ब्लॉकमुळे ऐन लग्नसराईत विवाहस्थळी पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे रविवारी मेगाहाल झाले. विशेष म्हणजे निम्म्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यातच बहुतांशी रेल्वेस्थानकांवर छतांची कामे सुरू असल्याने प्रवाशांना भर उन्हात लोकलची प्रतीक्षा करावी लागली. ब्लॉकमुळे दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकात रद्द करण्यात आली. त्यामुळे याच स्थानकातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडाली होती.

मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्यांवर परिणाम झाला. ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते. अप धीम्या मार्गावर धीम्या व जलद लोकल आणि मेल एक्‍स्प्रेस वळवण्यात आल्यामुळे स्थानिक प्रवाशांसह गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक कामे हाती घेण्यात आली होती. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. हतबल झालेल्या हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली. ऐन सुट्टीच्या दिवशी रत्नागिरी-दादर पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local Railway Mega Block Passenger Mob