लोकल प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या हातातील महागडे मोबाईल फोन खेचून धावत्या लोकलमधून पलायन करणाऱ्या चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली. हुसेन बाबा मिर्या शेख (२२) असे या चोरट्याचे नाव असून, त्याने एका दिवसामध्ये चार प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले.

नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या हातातील महागडे मोबाईल फोन खेचून धावत्या लोकलमधून पलायन करणाऱ्या चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली. हुसेन बाबा मिर्या शेख (२२) असे या चोरट्याचे नाव असून, त्याने एका दिवसामध्ये चार प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी या चोरट्यावर जबरी चोरीचे चार गुन्हे दाखल करून, त्याच्याकडून चारही गुन्ह्यातील मोबाईल फोन हस्तगत केले. त्याच्याकडून आणखी मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

आरोपी हुसेन बाब मिर्या शेख हा तरुण गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये राहण्यास असून, शनिवारी (ता.२) त्याने लोकलने कुर्ला येथून पनवेलला जाणाऱ्या अनिकेत पवार (३५) यांच्या हातातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन खेचून गोवंडी रेल्वेस्थानकात धावत्या लोकलमधून उडी टाकून पलायन केले; मात्र अनिकेतने आरडाओरड केल्याने गोवंडी रेल्वेस्थानकात तैनात असलेल्या पोलिस हवालदार क्षीरसागर, शिंदे आणि पोलिस शिपाई काकडे या तिघांनी आरोपी शेख याचा पाठलाग करून त्याला पकडले. या वेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ लुटलेल्या फोनव्यतिरिक्त इतर तीन मोबाईल आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी या मोबाईलबाबत त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने त्याच दिवशी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास गोवंडी रेल्वेस्थानकात, तसेच दुसरा मोबाईल फोन दुपारी सीवूड्‌स रेल्वेस्थानकात; तर तिसरा मोबाईल फोन गोवंडी रेल्वेस्थानकात लोकलमधील दिव्यांगांच्या डब्यात घुसून चोरल्याची कबुली दिली. वाशी रेल्वे पोलिसांनी आरोपी शहानवाज याच्याकडून जप्त केलेल्या सर्व मोबाईलवरून त्या-त्या मोबाईलधारकांशी संपर्क साधून मोबाईल परत करण्यात आले. चोरट्यावर चार जबरी चोरीचे गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local travelers Mobile thief arrested