लॉकडाऊनमुळे प्राण्यांची मनमुराद सैर; राणीबागेत वर्दळ नसल्याने क्रियाशीलतेत वाढ!

लॉकडाऊनमुळे प्राण्यांची मनमुराद सैर; राणीबागेत वर्दळ नसल्याने क्रियाशीलतेत वाढ!
लॉकडाऊनमुळे प्राण्यांची मनमुराद सैर; राणीबागेत वर्दळ नसल्याने क्रियाशीलतेत वाढ!

मुंबई : जगभरात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनने नागरिकांना घरात बंद केले असले तरी, प्राणी मात्र मनमुराद सैर करत याचा आनंद लुटत आहे. लॉकडाऊनमुळे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद आहेत. नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने प्राण्यांचा उत्साह आणि क्रियाशिलता वाढल्याचे प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी सांगत आहेत.

मुंबईतील राणीबागमध्ये ऐरवी सरासरी 15,000 नागरिक भेट देतात. तर, शनिवार, रविवारी या सुट्टीच्या दिवसांत ही संख्या 30,000 पर्यंत जात होती. मात्र, आता ते बंद असल्याने उद्यानातील नागरिकांचा वावर जवळपास थांबला आहे. त्यामुळे प्राण्यांच्या दिनचर्येत कोणताही अडथळा येत नसल्याने ते पुर्वीपेक्षा अधिक क्रियाशील दिसत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

भायखळ्यातील हे उद्यान तब्बल 52 एकर मध्ये पसरले आहे. त्यात 300 प्राणी, पक्षी आणि सरपटणारे जीव आहेत. यात विशेष आकर्षण आहे ते म्हणजे पेंग्विनचे. डोनाल्ड, डेझी, पोपेय, ऑलिव्ह, फ्लिपर, बबल आणि मोल्ट पेंग्विन हे पर्यटक नसल्याने सध्या आनंदात दिसत आहेत. तसेच, पर्यटक नसल्याने ते अधिक खेळकर झाले असून अन्य पेंग्विन भोवती पोहताना दिसत आहेत. हे सात पेंग्विन तब्बल दोन वर्षांपेक्षा गेल्या पाच महिन्यांत अधिक आरामशीर, आणि सक्रिय झाल्याचे कर्मचारी सांगतात.

हरिण हा कळपात राहणारा अतिशय भित्रा प्राणी. अगदी त्याला सांभाळणाऱ्या संरक्षकाने आवाज दिला तरी हरीण लांब जातात.  परंतु गेल्या काही महिन्यांत ते लक्षणीय प्रमाणात सक्रिय झाल्याची माहिती राणीबाग प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. पक्षी, हरणांचा कळप आणि पेंग्विन या शांत वातावरणाचा आनंद घेत आहेत. 

वाघ, बिबट्यांची मौज
बिबट्या, वाघ हे प्राणी फिरण्यास उत्सुक आहेत आणि आता प्रदर्शनाच्या काचेजवळ अधिक वेळ घालवत आहेत. बिबट्या ऐरवी पिण्याशिवाय पाण्याजवळ फिरकत नाही. मात्र, तो सध्या पाण्यात डुबक्या मारणे, पाण्यात खेळण्याची मजा लुटूत आहे, असे कर्मचारी सांगतात. संग्रहालयातील रॉयल बंगालच्या वाघाच्या जोडीतील पाच वर्षांची वाघीण करिश्माला 4000 चौरस मीटर पिंजऱ्यात ठेवल्यावर एक आठवडा ती नाईट शेल्टरमध्ये जात नव्हती. आता मात्र ती आपला दिवस पिंजऱ्यात पोहणे, उड्या मारणे, फिरण्यात घालवत आहे, असे संग्रहालयाचे संचालक डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले.

प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांचा आनंद आणि मनोबल वाढविण्यासाठी आम्ही कार्यक्रम आयोजित करत आहोत.  नैसर्गिक प्रवृत्ती सुधारण्यासाठी प्रत्येक आठवड्यात त्यांना छोटे टास्क सोपवले जात आहेत. 
- अभिषेक साटम, जीवशास्त्रज्ञ

हे प्राणी मात्र एकटे पडले
बिबट्या, वाघ आणि माकड मात्र पर्यटकांची वर्दळ नसल्याने काहीसे एकटे पडले आहेत. त्यामुळे त्यांना सांभाळणारे त्यांच्याशी संवाद साधत आहेत. वेळ जाण्यासाठी  नाविन्यपूर्ण कल्पना राबवत आहेत: वाघांना अन्नाची शिकार करण्याचा अनुभव देण्यासाठी झाडाला चिकनचे तुकडे लावले जात आहेत. तर, अस्वलासाठी फळांमध्ये मध दडवून ठेवले जात आहे. 

लवकरच प्राणीसंग्रहही ऑनलाईन
लवकरच यूट्यूब, फेसबुक, ट्विटरवर प्राणीसंग्रहालयातील प्राण्याची झलक पाहता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व सुरळीत झाल्यानंतर राणीबाग सर्वांसाठी नियमांचे पालन करून सुरू करण्यात येईल. मात्र, प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेत काही प्रमाणात राणीबाग टप्प्याटप्पात सुरू करण्यात येईल, असे संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com