आमदार साटम यांच्यावर गुन्हा दाखल करा : काँग्रेस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

आमदार साटम यांनी पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकी दिल्याची ऑडिओ क्‍लिप दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. पालिकेच्या सभागृहात शनिवारी (ता. 31) पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत भाजपकडे स्पष्टीकरण मागितले होते.

मुंबई : महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आमदार अमित साटम यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याने अधिकारी आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकाराने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आमदार साटम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कॉंग्रेसने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. 

आमदार साटम यांनी पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकी दिल्याची ऑडिओ क्‍लिप दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. त्यामुळे खळबळ उडाली होती. पालिकेच्या सभागृहात शनिवारी (ता. 31) पालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करीत भाजपकडे स्पष्टीकरण मागितले होते. या क्‍लिपमध्ये ज्या प्रकारची भाषा वापरली आहे, त्यामुळे पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेत कोणताही गैरव्यवहार झाला असल्यास आमदार म्हणून विधानसभेत तारांकित प्रश्‍न उपस्थित करता येतो किंवा मुख्यमंत्री, आयुक्तांकडे तक्रार करता येते. असे असतानाही कायदा हातात घेण्याचा अधिकार आमदार साटम यांना कोणी दिला, असा सवाल कॉंग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी केला आहे. 

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पालिका आयुक्तांनी आमदार साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच इमारत प्रस्ताव विभागात 50 हजार कोटींचा गैरव्यवहार झाला असल्यास त्याची चौकशी करावी, अशी मागणीही आश्रफ यांनी आयुक्तांकडे केली आहे. 
 

Web Title: Lodge FIR Against MLA Ameet Satam demanded by congress