Loksabha 2019 : ‘वंचित बहुजन’चे ३७ उमेदवार जाहीर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 16 मार्च 2019

मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीच्या या पत्रकार परिषदेला प्रकाश आंबेडकर, आमदार वारिस पठाण, लक्ष्मण माने, अण्णाराव पाटील, किसन चव्हाण आदी उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, की लक्ष्मण माने आणि अण्णाराव पाटील यांनी काँग्रेससोबत आघाडीचा शेवटचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने मागण्या मान्य न केल्याने सर्व ४८ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागला.

वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिलकुमार यांचा समावेश आहे. ते दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवतील. वंचित आघाडीने धनगर समाजातील सहा, मुस्लिम समाजातील दोन, बौद्ध समाजातील चार, माळी समाजातील तीन जणांना उमेदवारीत प्रतिनिधित्व दिले आहे, तर कोळी, आगरी, मातंग, कुणबी, शिंपी, धिवर, वंजारी, वडार, विश्वकर्मा, कोलाड, भिल्ल, वारली, माना आदिवासी, लिंगायत आणि कैकाडी समाजातील एक उमेदवार देत सोशल इंजिनिअरिंग करत असल्याचा दावा केला.  

बहुजन वंचित आघाडीने जातीचा उल्लेख केला असला तरी जात पाहून उमेदवारी दिलेली नाही. सर्व वंचितांचे प्रतिनिधित्व असावे यासाठी हा प्रयत्न आहे. इतर पक्षांनाही पुढे जाऊन अशाप्रकारे सर्वांना सामावून घ्यावे लागेल, असे आंबेडकर म्हणाले. 

औरंगाबादमधली जागा धर्मनिरपेक्ष जनता दलाला सोडली आहे. माजी न्या. बी. जी. कोळसे पाटील जनता दलाचे उमेदवार आहेत.   राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांकडे औरंगाबादला उमेदवारच नाही. त्यामुळे आघाडीने कोळसे पाटील यांना तरी पाठिंबा जाहीर करावा, असे आवाहन या वेळी आंबेडकर यांनी केले. ‘एमआयएम’ने लोकसभा लढविणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र ते विधानसभेत जितक्‍या जागा मागतील तितक्‍या देऊ, असेही त्यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार 
पहिला टप्पा - (११ एप्रिल २०१९) -
 वर्धा-धनराज वंजारी, रामटेक-किरण रोडगे, भंडारा-गोंदिया-एन. के. नान्हे, गडचिरोली-चिमूर-रमेश गजबे, चंद्रपूर-राजेंद्र महाडोळे, यवतमाळ-वाशीम-प्रवीण पवार

दुसरा टप्पा (१८ एप्रिल २०१९) - बुलडाणा-बळिराम सिरस्कार, अमरावती-गुणवंत देवपारे, हिंगोली-मोहन राठोड, नांदेड-यशपाल भिंगे, परभणी-आलमगीर खान अखिल मोहम्मद खान, बीड-विष्णू जाधव, उस्मानाबाद-अर्जुन सलगर, लातूर-राम गारकर

तिसरा टप्पा ( २३ एप्रिल २०१९) - जळगाव-अंजली बाविस्कर, रावेर-नितीन कांडेलकर, जालना-शरदचंद्र वानखेड, रायगड-सुमन कोळी, पुणे-अनिल जाधव, बारामती-नवनाथ पडळकर, माढा-विजय मोरे, सांगली-जयसिंग शेडंगे, सातारा-सहदेव एवळे, रत्नागिरी सिंधुदुर्ग-मारुती जोशी, कोल्हापूर-अरुणा माळी, हातकणंगले-अस्लम बादशाहजी सय्यद

चौथा टप्पा (मतदान २९ एप्रिल २०१९) - नंदूरबार-दाजमल मोरे, दिंडोरी-बापू बर्डे, नाशिक-पवन पवार, पालघर-सुरेश पडवी, भिवंडी- ए. डी. सावंत, ठाणे-मल्लिकार्जुन पुजारी, मुंबई दक्षिण-अनिलकुमार, मुंबई दक्षिण मध्य- संजय भोसले, ईशान्य मुंबई-संभाजी काशीद, मावळ-राजाराम पाटील, शिर्डी-अरुळ साबळे

Web Title: Loksabha Election 2019 Bahujan Aghadi Prakash Ambedkar Politics