Loksabha 2019 : प्रचारासाठी आता फेरीवाल्यांचाही वापर...

शलाका सावंत
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

ठाणे - रस्त्यांवरील फलक, रथयात्रा, जाहीर सभा आणि काही वर्षांपासून समाज माध्यमे असे पर्याय प्रचारासाठी वापरले जात होते; मात्र यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेतील फेरीवाल्यांचीही मदत राजकीय पक्षांकडून घेण्यात आली असून, या माध्यमातूनही मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न विविध पक्षांकडून होत आहे.

2014 मधील लोकसभा निवडणुकांप्रमाणेच या वर्षीही समाज माध्यमांवर राजकीय प्रचाराचा धुरळा उडाला आहे. फक्त त्या वेळी यात भाजप आघाडीवर होता. यंदा सर्वच पक्षांनी समाज माध्यमांना महत्त्व दिले आहे; पण समाज माध्यमांवरील प्रचाराबरोबरच प्रत्यक्ष प्रचारावर भर देण्यासाठी ठाणे मतदारसंघात फेरीवाले प्रचार करताना दिसून येत आहेत. एरवी हातात खाद्यपदार्थ, मोबाईलचे साहित्य, सौंदर्य प्रसाधने विकणारी लहान मुले गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत पक्षांची पत्रके वाटत आहेत. यामध्ये कल्याण मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. खासदारांच्या कामांची माहिती देणारी पत्रके वाटून थोडेफार उत्पन्न मिळत असल्याचे एका फेरीवाल्याने सांगितले. आपल्या पक्षाची भूमिका पटवून देण्यासाठी हा पर्याय उपयुक्त ठरत असल्याचे पक्ष कार्यकर्ते सांगतात.

फेरीवाल्यांच्या उत्पन्नात भर...
दिवसभर लोकलच्या फेऱ्यांमधून घास कोरडा करूनही हाताला पुरेसे पैसे मिळतील याची कोणतीही शाश्‍वती नसते. लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून काम मिळाल्यास फेरीवाल्यांचे तात्पुरते का होईना कल्याण होईल, म्हणूनच अनेकदा फेरीवाले स्वतः प्रचाराचे काम करण्याची तयारी दर्शवतात. एका दिवसासाठी 500 रुपयांचे मोल या फेरीवाल्यांना दिले जाते, अशी माहिती रेल्वेतील एक फेरीवाला प्रचारकाने दिली.

Web Title: Loksabha Election 2019 Howkers Use for Election Publicity