Loksabha 2019 : वरळी कोळीवाड्याचा मतदानावर बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी किनारी मार्ग प्रकल्पाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला फटका बसेल, अशी चर्चा सुरू आहे.

मुंबई - वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी किनारी मार्ग प्रकल्पाच्या विरोधात लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेला फटका बसेल, अशी चर्चा सुरू आहे.

नरिमन पॉइंट ते वरळीपर्यंत महापालिका बांधत असलेल्या किनारी मार्गासाठी वरळीच्या समुद्रात भराव टाकण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल आणि मासेमारीही कायमची बंद होईल, अशी भीती कोळीवाड्यातील मच्छीमार कुटुंबांनी व्यक्त केली आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही किनारी मार्गाचे काम "जैसे थे' ठेवण्यास सांगितले आहे. त्यानंतर शुक्रवारी कोळीवाड्यातील रहिवाशांनी बैठक घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा अंतिम निर्णय घेतला.

पर्यावरण व नागरिकांसाठी घातक असलेला किनारी मार्ग प्रकल्प मागणी केल्यानंतरही थांबत नसल्यास मतदान करून काहीही उपयोग नाही. त्यामुळे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेत आहोत, असे वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी जाहीर केले आहे. या भागातील मते प्रामुख्याने शिवसेनेला मिळणारी असल्याचे सांगितले जाते. या रहिवाशांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केल्यामुळे शिवसेनेला फटका बसण्याची शक्‍यता आहे. आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांतही असेच चित्र असेल, अशी चर्चा आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Varli Koliwada Boycott on Election