बेकायदा रुग्णालयांत लूट 

बेकायदा रुग्णालयांत लूट 

मानखुर्द - मानखुर्द आणि गोवंडी विभागाप्रमाणेच मुंबईच्या अनेक भागांत अनेक वर्षांपासून बेकायदा रुग्णालये व प्रसूतिगृहांचा बाजार जोरात सुरू आहे. तिथे रुग्णांकडून तपासणीसाठी अवाच्या सव्वा शुल्क आकारले जात असून त्यावर कोणाचेच निर्बंध नसल्याने रुग्णांच्या जीवाचे हाल होत आहेत. बेकायदा रुग्णालयांचे दरपत्रक ठरलेले नसल्याने तिथे रुग्णांची एक प्रकारे लूटच होत आहे. 

दवाखाना किंवा पॅथॉलॉजी लॅब चालवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे त्याबाबत नोंदणी करण्याची आवश्‍यकता नाही. त्यामुळे अशा दवाखान्यांवर अंकुश ठेवणे अशक्‍य होते. उपचारादरम्यान एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तरी संबंधित डॉक्‍टरची पात्रता तपासण्यासाठी जलद यंत्रणा नाही. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर किंवा आरोग्य विभागाने तक्रार केल्यानंतर त्याच्याविरोधात पोलिस कारवाई करू शकतात. बेकायदा रुग्णालयांची आणि प्रसूतिगृहांची यादी जरी पोलिसांना दिलेली असली, तरी त्याबाबत आरोग्य विभागाच्या अहवालाखेरीज व चौकशीखेरीज गुन्हा नोंदवता येत नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोग्य विभाग पोलिसांना यादी दिल्याचे सांगत हात झटकत आहे. 

बेकायदा खासगी रुग्णालयांत जरी 24 तास सेवा असली, तरी तिथे अनुभवी डॉक्‍टर वा प्रशिक्षित परिचारिका बहुतेक वेळा नसतातच. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी कमीत कमी कर्मचारी रुग्णालयांमध्ये नेमले जातात. 24 तास डॉक्‍टर उपलब्ध असतात. दिवसातून ठराविक वेळा किंवा रुग्ण अत्यवस्थ झाल्यास अनुभवी डॉक्‍टर रुग्णालयात येऊन उपचार करतात. प्रशिक्षित परिचारिका उपलब्ध असतीलच असे नाही. काही रुग्णालयांमध्ये परिचारिकांना प्रशिक्षणार्थी म्हणून किंवा अनुभव घेण्याच्या उद्देशाने नेमण्यात येत असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. 

अशी होते रुग्णांची लूट 
बेकायदा रुग्णालयांचे दरपत्रक ठरलेले नसते. दिवसाचे अडीच ते चार हजार रुपये शुल्क आकारले जाते. बाहेरून येणाऱ्या तज्ज्ञांचे शुल्क व औषधांचा खर्च वेगळा करावा लागतो. 24 तासांसाठी जरी रुग्ण रुग्णालयात असेल तरी किमान सात ते दहा हजारांचे बिल होते. अशा रुग्णालयांतच किंवा शेजारी रुग्णालयचालकाच्या मर्जीतले औषधाचे दुकान असते. तिथूनच औषधे घ्यावी लागतात. दोघे व्यवसायात भागीदार असतात किंवा ठराविक कमिशनचा व्यवहार असतो. जेनेरिक औषधांच्या दुकानातून स्वस्तात आणलेली औषधेही येथील डॉक्‍टर नाकारतात. 

धोका न पत्करता व्यवसाय 
अशा रुग्णालयांतून तापासंबंधित आजारांचेच आणि अपघातात किरकोळ जखमी झालेले रुग्ण बहुतांश दाखल करून घेतले जातात. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आणि गंभीर रुग्णांना मोठ्या खासगी किंवा सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यासाठी आवश्‍यक साधनसामग्री, व्हेंटिलेटर वा अतिदक्षता विभाग इथे नसतो. अशा रुग्णालयांमध्ये प्रसूतीची तसेच अपेंडिक्‍स वा हर्नियाच्या आजारासारख्या छोट्या शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था असते. शस्त्रक्रियेवेळी बाहेरून सर्जन व भूलतज्ज्ञांना बोलावण्यात येते. त्यानुसार वाढीव खर्चाचा भुर्दंड रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेतला जातो. 

रुग्णालयांची अवस्था 
- ताप वा किरकोळ जखमी असे रुग्ण घेतात 
- गंभीर रुग्ण मोठ्या रुग्णालयात हलवतात 
- हर्निया वा ऍपेंडिक्‍ससारख्या छोट्या शस्त्रक्रियाच होतात 
- बाहेरून सर्जन येऊन शस्त्रक्रिया करतात 
- आपत्कालीन स्थितीत बाहेरून मोठे डॉक्‍टर येतात 
- रोजचा खर्च पाच ते सात हजार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com