Raksha Bandhan 2019 : लाडक्‍या भाऊरायासाठी किडनी दान; दोन्हीही भावंडे आज निरोगी

अमित गवळे
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

ममता यांनी लाडक्‍या भाऊरायासाठी किडनी दान केली. आज ही दोन्ही भावंडे निरोगी आयुष्य जगत आहेत. अमित तर नव्या उत्साहात बहिणीने केलेल्या त्यागाची जाणीव ठेऊन कायद्याचे शिक्षण घेत आहे. 

रक्षाबंधन 2019
पाली : 2015 हे वर्ष अलिबाग तालुक्‍यातील चिंचोटी येथील सुरेश वाजंत्री यांच्यासाठी परीक्षेचे ठरले. त्यांच्या अवघ्या पस्तिशीतल्या अमित या मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. अशा वेळी किडनी प्रत्यारोपण हा पर्याय होता. या बिकट परिस्थितीत अमितची विवाहित बहीण ममता ही त्याच्या मागे ठामपणे उभी राहिली. एवढेच नाही, तर तिने लाडक्‍या भाऊरायासाठी किडनी दान केली. आज ही दोन्ही भावंडे निरोगी आयुष्य जगत आहेत. अमित तर नव्या उत्साहात बहिणीने केलेल्या त्यागाची जाणीव ठेऊन कायद्याचे शिक्षण घेत आहे. 

अमित वाजंत्री हा आता लोअर परेल येथील खासगी कंपनीत नोकरी करत आहे. बहीण ममता (सासरचे नाव - ममता सचिन आरेकर) पालघर येथे वास्तव्यास आहे. चार वर्षांपूर्वी अमितचे पाय सुजू लागले. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासण्यांनंतर डॉक्‍टरांनी दिलेल्या माहितीमुळे वाजंत्री कुटुंबीयांवर आभाळच कोसळले. अमितच्या दोन्ही किडन्या जवळपास निकामी झाल्या होत्या. त्यामुळे डायलिसिस सुरू झाले; परंतु जगण्याची एक आशा म्हणून त्याचे वडील सुरेश वाजंत्री आणि आईने किडनी देण्याची तयारी दर्शवली; परंतु वैद्यकीय कारणांमुळे हे शक्‍य झाले नाही. 

त्यानंतर कुटुंबीयांसमोर अंधार दिसत होता. अशा वेळी बहीण ममताने पुढाकार घेत आपल्या लाडक्‍या भाऊरायासाठी किडनीदान करण्याचा निर्णय घेतला. पती सचिन यांचाही त्यांनी होकार मिळवला. त्यामुळेच 23 मार्च 2015 रोजी प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. आता भाऊ -बहीण निरोगी आयुष्य जगत आहेत. 

ममता यांनी याबद्दल सांगितले की, माझा भाऊ निरोगी आयुष्य जगला पाहिजे, असे मला वाटले. त्याच्या प्रेमामुळे किडनी दान केली. शस्त्रक्रिया झाली, त्या वेळी माझा मुलगा अवघा तीन -चार वर्षांचा होता. माहेरची मंडळी आणि पती, सासू, सासरे सर्वांचाच पाठिंबा मिळाला. त्यामुळे हे दान करू शकले, असे सांगताना ममता आरेकर यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले. 

बहिणीमुळे मला दुसरे आयुष्य मिळाले. तिच्याबद्दल बोलण्यासाठी शब्दच नाहीत. आता कायद्याचे शिक्षण पूर्ण करत आहे. 
- अमित वाजंत्री 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: love of brother and sister