प्रेयसीच्या हत्येपूर्वी त्याने रक्तालाच बनविले कुंकू

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

प्रतिभाची हत्या करण्याआधी त्याने तिच्यासोबत सेल्फी सुद्धा काढला. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास दोघे गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. संध्याकाळी फक्त एकदा त्यांनी पाणी मागितले त्याशिवाय ते रुममधून बाहेर आले नाहीत. रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेलमधल्या कर्मचाऱ्याने जेवणासाठी म्हणून त्यांना आवाज दिला. दार ठोकल्यानंतरही आतून काही प्रतिसाद आला नाही.

मुंबई : कल्याणमधील नीलम गेस्ट हाऊसमधील प्रियकर आणि प्रेयसीच्या मृत्यू प्रकरणी नवा खुलासा झाला असून,  प्रेयसीची हत्या करण्याआधी तरुणाने रक्ताला कुंकू बनवून प्रेयसीच्या कपाळावर लावल्याचे समोर आले आहे.

शुक्रवारी कल्याणच्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये अरुण गुप्ता आणि प्रतिभा प्रसाद दोघे मृतावस्थेत सापडले होते. अरुणने प्रतिभाची गळा आवळून हत्या केली नंतर स्वत: गळफास घेऊन जीवन संपवले अशी माहिती महात्मा फुले पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी दिली होती. गावी वाराणसीला चाललोय असे सांगून अरुण गुप्ता घरातून बाहेर पडला होता. पण तो कल्याणमध्ये आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. हत्या करण्याआधी अरुणने खिशातून ब्लेड काढले. त्याच ब्लेडने स्वत:चा हात कापला व रक्त कुंकू म्हणून प्रतिभाच्या कपाळावर लावले.

प्रतिभाची हत्या करण्याआधी त्याने तिच्यासोबत सेल्फी सुद्धा काढला. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास दोघे गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले. संध्याकाळी फक्त एकदा त्यांनी पाणी मागितले त्याशिवाय ते रुममधून बाहेर आले नाहीत. रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेलमधल्या कर्मचाऱ्याने जेवणासाठी म्हणून त्यांना आवाज दिला. दार ठोकल्यानंतरही आतून काही प्रतिसाद आला नाही. कर्मचाऱ्याला संशय आला म्हणून त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा प्रतिभा बिछान्यावर पडलेली होती तर अरुणने पंख्याला लटकून गळफास घेतला होता. पोलिसांना त्याच्या मृतदेहाजवळ ब्लेडही सापडला. नेमकी कुठल्या कारणामुळे हत्या आणि आत्महत्या झाली याचा पोलिस शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lovers suicide in Kalyan