चार वर्षांत अर्थशास्त्रात एमए!

नेत्वा धुरी
रविवार, 26 मार्च 2017

मुंबई - अर्थशास्त्र विषयातील मुलांची गोडी वाढावी, यासाठी फोर्टमधील सेंट झेवियर्स महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पब्लिक पॉलिसीतर्फे नवा अभ्यासक्रम सुरू होत आहे. अर्थशास्त्रात थेट चार वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए) पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

मुंबई - अर्थशास्त्र विषयातील मुलांची गोडी वाढावी, यासाठी फोर्टमधील सेंट झेवियर्स महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पब्लिक पॉलिसीतर्फे नवा अभ्यासक्रम सुरू होत आहे. अर्थशास्त्रात थेट चार वर्षांत पदव्युत्तर अभ्यासक्रम (एमए) पूर्ण करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

बीएचा अभ्यासक्रम सेंट झेवियर्स महाविद्यालयात आधीपासूनच आहे; परंतु एमए करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागतात. त्याऐवजी फक्त चार वर्षांचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचेल, असे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पब्लिक पॉलिसी या विभागाचे प्रमुख डॉ. नीरज हातेकर यांनी सांगितले.

शनिवारी याबाबतची अंतिम बैठक सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाली. जूनपासून हा अभ्यासक्रम सुरू होईल. हा अभ्यासक्रम दिल्ली विद्यापीठापेक्षा सरस ठरेल, असे डॉ. हातेकर म्हणाले. देशातील सर्वात जुना अर्थशास्त्र विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्थशास्त्र विभागाला नुकतेच नवीन नाव मिळाले. "मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स ऍण्ड पब्लिक पॉलिसी' असे नाव या विभागाला दिल्यानंतर हा पहिलाच निर्णय घेण्यात आला आहे. अनेक कामे प्रगतिपथावर आहेत, असे ते म्हणाले.

या विभागाने नुकतेच आदिवासी मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. विभागांतर्गत काम करणाऱ्या आदिवासी विकास ग्रुपद्वारे "आश्रमशाळांतील सुधारणा' या विषयावर काम करण्यास विभाग उत्सुक आहे. आश्रमशाळांतील शैक्षणिक सुधारणा, आदिवासींसाठी अनुदानाच्या पद्धती, वन हक्क कायद्याची अंमलबजावणी या विषयांवर संशोधन करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी पत्रात दर्शवण्यात आली आहे. पालघरमधील आश्रमशाळांतून शैक्षणिक सुधारणांच्या निकषांचा अभ्यास करण्यास सुरुवात होईल.

मुंबईतील महाविद्यालयांत प्रथमच अर्थशास्त्र विषयाचा इंटिग्रेटेड कोर्स
जूनपासून सेंट झेवियर्स महाविद्यालयात होणार सुरू
हा अभ्यासक्रम दिल्ली विद्यापीठापेक्षाही उत्तम असल्याचा दावा

Web Title: ma economics education syllabus