महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी मधु पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनची नुकतीच बेलापूर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये मधु पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील बांधकाम क्षेत्रात परप्रांतीय उद्योजकांचा दबदबा निर्माण झाला आहे. हे जरी वास्तव असले तरी गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. दरवर्षी या संघटनेच्या अध्यक्षपदी नवीन अध्यक्ष विराजमान होत असतो. याअनुषंगाने महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनची नुकतीच बेलापूर येथे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यामध्ये मधु पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

असोसिएशनच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष आनंद पाटील, लक्ष्मण साळुंखे, हितेश सावंत, सहसचिव अजय पाटील, सहखजिनदार व सहसचिव संतोष उगले, सहसचिव आशीष कवडे, खजिनदार लक्ष्मण साळुंखे, महासचिव बाबासाहेब भोसले, सहखजिनदार प्रशांत शेटे, महेश माटे, प्रशांत पिंगळे, संतोष आंबवणे, राजेंद्र कोलकर, अजित येलमार व सल्लागादरपदी प्रकाश बाविस्कर, किरण बागड, के. के. म्हात्रे, विकास भामरे यांची निवड करण्यात आली आहे. 

यामध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष मधु पाटील म्हणाले की, महाराष्ट्रीयन असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनची स्थापना केली. नवी मुंबई व रायगड या भागामध्ये असणाऱ्या महाराष्ट्रीयन बिल्डर्सच्या अडचणी, समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न या बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये राहत असणाऱ्या रहिवाशाला घर घेत असताना मराठी माणसांकडे घरे घेण्यासाठी गेल्यानंतर तो एक आपला विश्‍वासाचा वाटतो. तो विश्‍वास ठेऊन घरांची बुकिंग करतो. यामुळे महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनकडूनही अधिकाधिक नागरिकांचा विश्‍वास वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. यावेळी मावळते अध्यक्ष संग्राम पाटील यांच्या कार्यकारिणी व सदस्यांनी उत्तम पद्धतीचे काम केले असून, आता महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून ती चांगल्या पद्धतीने निभावेन, असा विश्‍वास पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनसाठी सर्वतोपरी सदस्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे. त्याचप्रमाणे पालिका, नगरपालिका, सिडकोशी संबंधित असणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीही समजून घेत त्यांचे प्रश्‍न मार्गी लावणार आहे. शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना पूर्णत्वाने अमलात आणण्याचा प्रयत्न करणार असून, जास्तीत जास्त परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. तसेच ग्राहकांचे हित जपण्याचे व परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उत्तम प्रतीचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- मधु पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhu Patil as President of Maharashtra Builders Association