Maha Shivratri 2023 : डोंबिवली मधील पुरातन शिवमंदिरात भाविकांची रीघ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maha Shivratri 2023

Maha Shivratri 2023 : डोंबिवली मधील पुरातन शिवमंदिरात भाविकांची रीघ

डोंबिवली - शिवभक्तांसाठी महाशिवरात्र हे पवित्र असे व्रत असून या दिवशी शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाचे दर्शन भाविक घेत असतात. शनिवारी आलेल्या महाशिवरात्री निमित्त डोंबिवली व जवळील पुरातन शिवमंदिरात भाविकांनी शिवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती.

डोंबिवली येथील पिंपळेश्वर मंदिर आणि खिडकाळेश्वर मंदिरात भाविकांची काल रात्रीपासून रीघ लागली आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील मंदिर परिसरात करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील देसाई गावाजवळील खिडकाळी येथे खिडकाळेश्वर मंदिर आहे. पांडवकालीन हेमाडपंथी बांधणीचे तेराव्या शतकातील हे मंदिर अशी प्राचीन ओळख या मंदिराची आहे. येथील शिवलिंग हे स्वयंभू असल्याने मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली व आसपासच्या परिसरातून भाविक या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येतात. तसेच महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्ताने काशी, अयोध्या, उत्तराखंड येथून साधू संत येते वास्तव्यास आलेले आहेत.

खिडकाळेश्वर मंदिर ट्रस्ट आणि गावदेवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मंदिरात महाशिवरात्री निमित्त शिवलिंगाची मोठी रांगोळी मंदिर परिसरात साकारण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षां पासुन शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करण्यास मनाई करण्यात आली आहे. दुधाचा अभिषेक केल्याने दुधाची नासाडी होते, त्यापेक्षा ते गरिबांना दान करा आई आवाहन करण्यात येत असून भाविकांनी देखील त्याला प्रतिसाद दिला आहे.

डोंबिवली मधील पिंपळेश्वर मंदिर हे देखील प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या मंदिर परिसरात देखील भाविकांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ यांच्या वतीने याठिकाणी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच भाविकांसाठी आरोग्य शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. नेत्र तपासणी, रोग निदान, मोफत औषधोपचार ठेवण्यात आले होते याचा अनेक भाविकांनी लाभ घेतल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी दिली. दोन दिवस या ठिकाणी भजन, कीर्तन चे कार्यक्रम तसेच महाप्रसाद ठेवण्यात आला आहे.