Raigad Building Collapse: 10 वर्षे जुनी इमारत पत्त्यासारखी कशी कोसळली?, पाच जणांवर गुन्हा दाखल

पूजा विचारे
Tuesday, 25 August 2020

या इमारतीच्या बांधकामाला केवळ १० ते १५ वर्षे झाले होते. तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली.

मुंबईः  महाड शहरात काजलपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे.  सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. यात ४१ कुटुंब राहत होते. त्यातील ६० जणांना बाहेर काढलं असून आतापर्यंत या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १८ लोक अद्याप आत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तात्काळ मदत कार्य सुरू केलं. एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे. 

याप्रकरणी आता पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये बिल्डर, वास्तुविशारद, आरसीसी सल्लागार, मुख्याधिकारी आणि इंजिनीअर यांचा समावेश आहे.

तारीक गार्डन असं या कोसळलेल्या इमारतीचं नाव आहे. तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. मुसळधार पावसामुळे या इमारतीचा काही भाग कोसळत होता. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचाः  Raigad Building Collapse: NDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर, दोघांचा मृत्यू

या इमारतीच्या बांधकामाला केवळ १० ते १५ वर्षे झाले होते. त्यामुळे अवघे १० ते १५ वर्षे जुनी इमारत पडूच कशी शकते असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

या दुर्घटनाग्रस्त इमारतीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूर नियंत्रण रेषेत तळ्याच्या शेजारीच ही इमारत बांधण्यात आली होती, अशी माहिती समजतंय.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, इमारत केवळ १० ते १५ वर्षे जुनी आहे. त्यामुळे पावसामुळे इमारत कोसळली असं सांगू शकत नाही. तर तारीक गार्डन ही इमारत फक्त १० वर्षे जुनी आहे. या इमारतीचं बांधकाम निकृष्ठ दर्जाचं होतं, असं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. 

युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरु 

एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.  घटनास्थळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कुटुंबाना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ८ तव, १० जेसीबी, ४ पोखलेन तसेच, १५ डंपरच्या साहाय्याने मातीचा ढिगारा हटवण्यात येत आहे. सध्या पुणे, महाबळेश्वर ट्रेकर्स, पनवेल येथून फायर ब्रिगेडची टीम महाडमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे.  ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे १० वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या ५ मजली इमारतीत साधारण ४५ ते ५० फ्लॅट होते. यात २०० ते २५० लोक राहत होते.

Mahad Building Collapse only ten years old building Five people have been charged


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahad Building Collapse only ten years old building Five people have been charged