महाडमधील दरडीच्या कटू आठवणी पाठ सोडत नाहीत!

दासगाव अजूनही धोकादायक आहे.
दासगाव अजूनही धोकादायक आहे.

मुंबई : कुणी मुलगा गमावला, तर कुणी भाऊ. गावांनी गाव गमावला, तर शाळेने मुले. पै पै जमा करून उभा केलेला संसार क्षणात उद्‌ध्वस्त झाला. महाड तालुक्‍यामध्ये २५ आणि २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीतील काळ्याकुट्ट आठवणी १४ वर्षांनंतरही ग्रामस्थांची पाठ सोडत नाहीत. या आपत्तीमध्ये १७० जणांना प्राण गमवावे लागले होते. 

२५ जुलैची ती काळरात्र अनेकांच्या अंगावर काटा उभा करते. तालुक्‍यातील जुई, रोहण, कोंडीवते आणि दासगाव या ठिकाणी रात्री दरडी कोसळून १७० जणांना प्राण गमवावे लागले होते; तर शेकडो घरे उद्‌ध्वस्त झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले. इतक्‍या वर्षांनंतरही या आपत्तीच्या व आप्तजनांना गमावल्याच्या कटू आठवणी येथील ग्रामस्थांना सतावत आहेत. या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत. त्यावेळी घडलेल्या या घटनेने आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा राहाता; तर काहींचे डोळे पाणावतात. 

रोहण येथील मिताली दवंडे या छोट्या मुलीचा त्या गावात कोसळलेल्या दरडीतून जीव वाचला होता. ती गोठ्यातील रेड्याच्या पायाखाली होती. कुणाल गिरीने आपले वर्गमित्रही या घटनेत दगावल्याचे सांगितले. 

पूर भरपूर आल्याने व वीज नसल्याने दोन दिवस काहीच करू न शकल्याची खंत व्यक्त केली. जुई व रोहन येथील दरड काढणे कठीण होते असेही तो म्हणाला. दासगावमधील मनोहर शिंदे त्या आठवणी सांगताना अजूनही शहारतात. संपूर्ण दासगावमध्ये पाणी शिरलेले असतानाच २५ जुलैला सायंकाळी सव्वाचार वाजता स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला. 

पाणी कित्येक फूट उंच उडाले. त्याचवेळी डोंगर भागात धावपळ सुरू झाली होती. एरव्ही दिसणारी घरे दरडीखाली पूर्णपणे गाडली गेली होती. अशावेळी मी तातडीने मदतीला धावलो. माझ्यासमोर अनेक जण दरडीखाली गाडले गेले होते. त्या अवस्थेत चार माणसांचे जीव आम्ही वाचवले. यंत्रसामुग्री वेळेत न मिळाल्याने व पुराच्या पाण्यामुळे संपर्क होत नसल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

गोठे गावचे सुनील जाधव यांनी सांगितले, की गावामध्ये पुराचे पाणी चढलेले असल्याने रात्रभर कोणीही झोपलेले नव्हते. दुसऱ्या दिवशी शिडी टाकून आम्ही घराच्या बाहेर पडलो; तेव्हा दासगावच्या रेल्वे पुलावर मोठी गर्दी झालेली होती. या वेळी दासगावला ४० हून अधिक लोक मरण पावले होते. 

कल्पनेतला गावही नाही
वलंग न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये शिकणारी जुई व रोहन येथील १६ मुले या दरडीखाली गाडली गेली. त्यांच्या आठवणी सांगताना शाळेचे मुख्याध्यापक राजन कुर्डूनकर गहिवरले. पावसाचा जोर वाढल्याने शाळा लवकर सोडली होती. मुलांना माझा गाव हा निबंध लिहून आणण्यासाठी सांगितला होता. त्याच रात्री दरडीने या १६ मुलांचे प्राण घेतले. मुलांच्या कल्पनेतला तो गावही राहिला नाही आणि निबंध लिहिणारी मुलेही राहिली नाहीत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com