पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी महाड नगरपालिका सज्ज

सुनील पाटकर
सोमवार, 18 जून 2018

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पालिकेने माहिती तंत्रज्ञान विभागाकडून एसएमएस अलर्ट सुविधा सुरू केली आहे. यात हवामान व पावसाचा अंदाज, भरती ओहोटीची स्थिती व पूर परिस्थितीबाबत आवश्यक त्या सूचना असतात.

महाड - महाड शहरातील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी महाड नगरपालिका सज्ज झाली आहे. मदत कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधन सामुग्रीसह पालिकेत चोवीस तास नियंत्रण कक्ष व नागरिकांना सतर्क करण्यासाठी खास एसएमएस अलर्ट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. पूरपरिस्थितीत नागरिकांना याची मोठी मदत होणार आहे.
सावित्री व गांधारी नदीच्या काठावर महाड वसले असल्याने शहराला दरवर्षी पुराचा तडाखा बसत असतो. त्यामुळे पालिकेला कायम सतर्क रहावे लागते या दृष्टिने पालिकेने आपत्ती व्यवस्थापन करण्याकरीता कृती आराखडा तयार केला आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पालिकेने माहिती तंत्रज्ञान विभागाकडून एसएमएस अलर्ट सुविधा सुरू केली आहे. यात हवामान व पावसाचा अंदाज, भरती ओहोटीची स्थिती व पूर परिस्थितीबाबत आवश्यक त्या सूचना असतात. व्यापारी, पत्रकार, अधिकारी, सामजिक व विविध संघटना, शाळा यांच्या मोबाईल क्रमांकावर हा एसएमएस पाठविला जात आहे. 

मदत कार्यासाठी पालिकेकडे चार होड्या असुन आवश्यकता भासल्यास या होड्यांमधून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जाणार आहे. पोहणा-यांची यादी, मदत कार्यासाठी लागणारी लाईफ जॅकेट, बलून लाईट रिंग, दोरखंड, बॅटरी, वाहने, स्थलांतरीत ठिकाणे व तेथील व्यवस्था या बाबतचे नियोजन झाले आहे. शहरातील गिर्यारोहकांनाही मदत कार्यात समावून घेतले जाणार आहे. महाबळेश्वर व रायगड किल्ला परिसरात अतिवृष्टी झाल्यास त्याचा परिणाम महाड मधील नद्यांची पातळी वाढण्यास होत असल्याने येथेही संपर्क यंत्रणा ठेवण्यात आलेली आहे. 

पूर स्थितीत मदतकार्यासाठी पूर्वसूचना गट, शोध व सुटका, प्रथमोचार, भोजन, निवारा व्यवस्था, पिण्याचे पाणी, शहर स्वच्छता असे गट नेमून प्रत्येकावर त्या त्या गटाची जबाबदारीही निश्चित केलेली आहे. 

  • महाड शहरामध्ये 1989, 1994, 2005, 2007, 2016 ला पूर.
  • 2005 - मोठा पूर.
  • पशुधन हानी 269, स्थलांतरीत कुटुंब 312, दुकाने 1 हजार 276
  • धोक्यात येउ शकणारी घरे 270

शहरात येणाऱ्या पूर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी परिपूर्ण आरखडा तयार असुन केवळ आराखडा नाही तर पालिकेने तशी जय्यत तयारीही केलेली आहे. आवश्यक ती साधने मनुष्यबळ व इतर बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे - गणेश पाटील ( आपत्ती विभाग प्रमुख,महाड नगरपालिका) 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: Mahad municipality ready to overcome flood situation