महड विषबाधा प्रकरण ; गिरीश बापट यांच्याकडून शिंदे कुटुंबाचे सांत्वन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

कौटुंबिक वादातून प्रज्ञाने सोमवारी (ता. 18) वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवणात फोरेट विष मिसळल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणात पाच जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. याशिवाय अत्यवस्थ रुग्णांची संख्या चोवीसच्या घरात असल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.

खालापूर : महड विषबाधा प्रकरणातील महिला आरोपी प्रज्ञा ऊर्फ ज्योती सुरेश सुरवशे हिला फाशीची किंवा कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी करणार असल्याचे आश्‍वासन अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी दिले. शनिवारी त्यांनी शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन केले. 

कौटुंबिक वादातून प्रज्ञाने सोमवारी (ता. 18) वास्तुशांतीच्या कार्यक्रमात जेवणात फोरेट विष मिसळल्याचे तपासात उघड झाले होते. या प्रकरणात पाच जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. याशिवाय अत्यवस्थ रुग्णांची संख्या चोवीसच्या घरात असल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. विषबाधा प्रकरणात तीन मुले गमाविलेल्या शाहूराज व श्‍याम शिंदे कुटुंबाला मंत्री गिरीश बापट, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांनी भेट दिली.

बाधित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि आरोपी महिलेला फाशीसारखी कठोर शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्न करील, असे आश्‍वासन बापट यांनी दिले. याशिवाय उपचार घेत असलेल्या सर्व रुग्णांच्या खर्चाचा भार शासन उचलणार असल्याचे बापट यांनी सांगितले. 

Web Title: Mahad Poisoning Case Consolation by Girish Bapat