नीलक्रांतीअंतर्गत नवीन मच्छीमार जेट्टींसाठी 415 कोटी मंजूर

विजय गायकवाड
बुधवार, 11 एप्रिल 2018

मच्छीमारनगर (कफ परेड) येथे नवीन अत्याधुनिक एचडीपीई मच्छीमार नौकेचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी श्री. जानकर बोलत होते. यावेळीमत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक, सहायक आयुक्त अशोक जावळे,  क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग प्रा. लि. चे संचालक कॅप्टन (निवृत्त) फिरोज दलाल, कमांडर (नि.) विजय पाटील, मुख्य तांत्रिक सल्लागार ग्युडो बोथे, लिटमस मरीन इनोव्हेशन प्रा. लि. चे विपनन प्रमुख विशाल पटाल्ये, मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयेश भोईर आदी उपस्थित होते.

मुंबई : केंद्र शासनाने नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून नवीन मच्छीमार जेट्टी बांधकामासाठी 415 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य शासनही मच्छीमारांच्या कल्याणासाठी अनेक पायाभूत सोयी- सुविधांचे निर्माण करत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन स्वत:ची प्रगती साधावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले.

मच्छीमारनगर (कफ परेड) येथे नवीन अत्याधुनिक एचडीपीई मच्छीमार नौकेचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी श्री. जानकर बोलत होते. यावेळीमत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक, सहायक आयुक्त अशोक जावळे,  क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग प्रा. लि. चे संचालक कॅप्टन (निवृत्त) फिरोज दलाल, कमांडर (नि.) विजय पाटील, मुख्य तांत्रिक सल्लागार ग्युडो बोथे, लिटमस मरीन इनोव्हेशन प्रा. लि. चे विपनन प्रमुख विशाल पटाल्ये, मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयेश भोईर आदी उपस्थित होते.

पारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कष्ट पडतात, असे सांगून श्री. जानकर म्हणाले की, पारंपरिक लाकडी बोटींचे तसेच फायबर बोटींचे आयुष्य खूप कमी आहे. या बोटींचा देखभाल दुरुस्ती खर्चही मोठा आहे. त्या तुलनेत आज  सादर करण्यात आलेली आधुनिक एचडीपीई बोट 20 वर्षाहून अधिक टिकाऊ आहेत. एलपीजी इंजिन किंवा इलेक्ट्रिक इंजिनचा वापरही या बोटींमध्ये करण्यात येत असल्याने त्या पर्यावरणपूरक असून डिझेलसाठीचा मोठा खर्च आणि वाचणार आहे. या बोटींसाठी सोलर इंजिनचाही वापर शक्य असल्याने पूर्णत: प्रदुषणमुक्त आणि पैशाची बचतही होऊ शकते. मच्छीमारांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उन्नती साधावी, असे ते म्हणाले.

जानकर पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून  नवीन जेट्टी बांधकामासाठी 415 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नवीन आधुनिक जेट्टींच्या बांधकामामुळे मच्छीमारांना मासे उतरवून जवळच्या बाजारपेठेपर्यंत वाहतूक करणे सोपे जाणार आहे. राज्य शासन मच्छीमारांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. मत्स्योत्पादनाला अधिकचा दर मिळावा यासाठी मासे व अन्य मत्स्योत्पादनावर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्याचे मत्स्यविकास महामंडळ यापूर्वी तोट्यात होते ते शासनाच्या योग्य धोरणामुळे सध्या नफ्यात आले आहे.

या एचडीपीई बोटी लिटमस मरीन इनोव्हेशन प्रा. लि. आणि क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग यांच्या संयुक्त भागीदारीतून फ्रान्सवरुन आयात केल्या असून जर्मन तसेच जपानवरुन आयात करण्यात आलेल्या इंजिनचा यामध्ये वापर करण्यात आलेले आहे. यावेळी जानकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या बोटीची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी बोटीत बसून समुद्रात फेरफटकाही मारला.

Web Title: Mahadev Jankar approved funds for fisherman