Mumbai News : डोंबिवली मध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai News : डोंबिवली मध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली

Mumbai News : डोंबिवली मध्ये महानगर गॅसची पाईपलाईन फुटली

डोंबिवली - डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर परिसरात महानगर गॅसची पाईपलाईन फुटून गॅस गळती झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. पाऊण तास गॅस गळती झाल्यानंतर महानगर कडून त्या लाईन वरील गॅस पुरवठा बंद करण्यात आला. या परिसरात एका इमारतीचे काम सुरू असून जेसीबी ने खणताना ही लाईन फुटली. यामध्ये कोणतीही हानी झाली नसली तरी पाऊण तासाने गॅस गळती सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

गांधीनगर परिसरात चिंतामणराव देशमुख मार्गावर एका इमारतीचे काम सुरू आहे. या कामकाजावेळी जेसीबी ने खणण्याचे काम सुरू असताना सायंकाळी 5 ते 5.15 च्या सुमारास जमिनीखालून गेलेल्या महानगर गॅस च्या पाईपलाईनला धक्का बसला आणि पाईपलाईन फुटली. गॅसचा प्रेशर जास्त असल्याने मोठ्याने आवाज येऊ लागला.

गॅस लाईन फुटल्याचे समजताच जेसीबी चालकाने तेथून पळ काढला. मोठा आवाज आणि गॅसचा वास येऊ लागल्याने नागरिकांनी चौकशी केली असता गॅसची लाईन फुटल्याचे लक्षात आले. स्थानिक नागरिक शशिकांत कोकाटे, मिलिंद म्हात्रे यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाल दिली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पहाणी केली. महानगर गॅसच्या कर्मचाऱ्यांना देखील याची माहिती देण्यात आली. परंतु अत्यावश्यक सेवा येण्यास तास दिड तासाचा कालावधी लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिक कोकाटे यांनी गॅस लाईनचा वॉल शोधून त्या कार्यालयाची चावी बनविण्यास सांगितले. तेवढ्यात सायंकाळी पावणे 7 च्या सुमारास महानगर कडून या लाईनवरील गॅस पूरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर महानगरचे कर्मचारी नितेश ढोके हे घटनास्थळी आले.

पाईपलाईन गळती झालेल्या ठिकाणी एन्ड कॅप बसविण्यात आली आहे. हे काम पूर्ण होऊन गॅस पुरवठा सुरळीत सुरू होण्यास तासाभराचा कालावधी लागू शकतो असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. महानगर गॅस पूरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांना सायंकाळी जेवण बनविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

असे घडल्यास माती टाका

महानगर गॅसची पाईपलाईन फुटल्यास त्या जागेवर माती टाका असे आवाहन महानगर गॅस कंपनी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. गॅस लिकेज झाला त्याठिकाणी स्पार्क झाल्यास दुर्घटना घडू शकते असे ही ते म्हणाले.