महामानवाला आदरांजलीसाठी चैत्यभूमीवर महासागर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई - दादर रेल्वे स्थानकात उतरल्यापासूनच जथ्याजथ्याने एका ओढीने चैत्यभूमीकडे जाणारा भीमसैनिकांचा अफाट महासागर... त्यातून मध्येच एखाद्या भीमसैनिकाने दिलेल्या घोषणेला "जय भीम'च्या गजराची साथ... ठिकठिकाणी ऐकू येणारी भीमगीते... निळ्या लाटा आणि सागरतीरी लोटलेली गर्दी... असे चित्र मंगळवारी होते. चैतन्यसागराने मंगळवारी महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना चैत्यभूमीवर अभिवादन केले. नोटाबंदीचा काहीसा फटका गर्दीला बसला असला तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत भर टाकत आंबेडकरी अनुयायी रविवारपासूनच दादर परिसरात दाखल झाले होते.

मुंबई - दादर रेल्वे स्थानकात उतरल्यापासूनच जथ्याजथ्याने एका ओढीने चैत्यभूमीकडे जाणारा भीमसैनिकांचा अफाट महासागर... त्यातून मध्येच एखाद्या भीमसैनिकाने दिलेल्या घोषणेला "जय भीम'च्या गजराची साथ... ठिकठिकाणी ऐकू येणारी भीमगीते... निळ्या लाटा आणि सागरतीरी लोटलेली गर्दी... असे चित्र मंगळवारी होते. चैतन्यसागराने मंगळवारी महामानव, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना चैत्यभूमीवर अभिवादन केले. नोटाबंदीचा काहीसा फटका गर्दीला बसला असला तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत भर टाकत आंबेडकरी अनुयायी रविवारपासूनच दादर परिसरात दाखल झाले होते. देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या या अनुयायींनी या वेळीही शिस्तीचे दर्शन घडविले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतमबुद्ध यांच्या प्रतिमा, छायाचित्रे, बिल्ले, धम्मचक्र, आंबेडकरांची ग्रंथसंपदा, चळवळीची पुस्तके यांच्या खरेदी-विक्रीदरम्यान सुट्या पैशांवरून भीमअनुयायी आणि विक्रेत्यांमध्ये वाद होत होते. त्यावर तोडगा काढत या वस्तूंची डझनावर खरेदी करून वाद थांबवत, शांतता आणि शिस्त राखली जात होती. सातत्याने होत असलेल्या टीकेला मोडीत काढत, अस्वच्छता आणि बेशिस्तीला कुठेही थारा मिळणार नाही याची दक्षता विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते घेत होते. शुभ्र वस्त्र परिधान केलेले जथ्थे चैत्यभूमीकडे मार्गक्रमण करीत होते. त्यात पालिकेने रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवल्यामुळे अनुयायांना त्रास होत नव्हता. चैत्यभूमीवर येणाऱ्या लोंढ्यांमुळे दादरमधील रस्ते आणि गल्ल्या गर्दीने फुलून गेल्या होत्या. रविवारपासून आलेल्या या नागरिकांसाठी मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवत आपली कामगिरी बजावली.

मोफत भोजनदान, पाणी, बिस्कीट, चहाचे स्टॉल्स, वैद्यकीय सेवा कक्ष, मोफत नेत्रतपासणी, महापालिकेने टाकलेला मांडव, फिरती स्वच्छतागृहे यांची दाटी झाली होती. येथे विविध राजकीय सभा होत असल्याने, ध्वनी आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी पुस्तक, ध्वनिचित्रफितींच्या स्टॉल्समध्ये अंतर ठेवले होते. कलाकारांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या भीमगीतांच्या सीडी विकण्यासाठी तब्बल 20 स्टॉल्स उभारण्यात आले होते. त्यामुळे दरवर्षी होणारी चेंगराचेंगरी यंदा कमी जाणवली. शिवाजी पार्कातील मैदानावर उडणारा मातीचा धुराळा विचारात घेता पालिकेने बारीक जाळी लावली होती. चैत्यभूमीवरील अभिवादनाची रांग दुपारी एक वाजण्याच्या सुमारालाच वरळी नाक्‍यापर्यंत पोचली होती.

चोख सुरक्षा व्यवस्था
लाखोंच्या संख्येने अनुयायी येणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दादर रेल्वे स्थानकापासूनच चैत्यभूमीपर्यंत पोलिसांनी टेहळणी मनोरे उभे केले होते. डोळ्यांत तेल घालून पोलिस गर्दीवर लक्ष ठेवत होते. वाहतूक पोलिस, समता दलाचे प्रतिनिधी, विविध सामाजिक संस्था-संघटनांचे कार्यकर्ते, होमगार्ड, शाळा-महाविद्यालयांतील एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करत होते.

सवलतींमुळे ग्रंथसंपदेची लक्षवेधी विक्री
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायींना विविध ठिकाणांहून आलेल्या संस्थांकडून सवलतीच्या दरात पुस्तके देण्यात येत आहेत. कला, साहित्य, पुरोगामी विचार, चळवळी, महापुरुषांची चरित्रे, स्पर्धा परीक्षांची पुस्तके यासोबतच भारतीय संविधानाची पुस्तके विक्रीसाठी ठेवली आहेत. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके, महात्मा फुले, शाहू महाराज, महापुरुषांची चरित्रे असे विविध ग्रंथ या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. चैत्यभूमी परिसरात लावलेल्या या पुस्तक स्टॉल्समध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली अशा विविध शहरांतील प्रकाशन संस्थांचे स्टॉल्स आहेत. मराठीसह इंग्रजी, हिंदी; तसेच प्रादेशिक भाषांमधील पुस्तके या स्टॉल्सवर विक्रीसाठी ठेवली आहेत. शंभर रुपयांत एक किलो पुस्तके असा दर असल्याने, या पुस्तक खरेदीला गर्दी होत आहे. कला, साहित्य, विपश्‍यना, धम्म या विषयांतील पुस्तकांचे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत.

राज्य सेवा परीक्षेची सुमारे 50 हून अधिक पुस्तके युनिक फिचर्सने विक्रीसाठी ठेवली आहेत; तर रोकडे प्रकाशनने पाचशे-हजार रुपये किमतीची पुस्तके 100 रुपयांत विक्रीला ठेवली आहेत. या योजनेमुळे ग्रंथप्रेमींची या स्टॉल्सवर गर्दी होत आहे. रविवारी सायंकाळपासून या ठिकाणी वाचनप्रेमींनी गर्दी केली होती. उद्यापर्यंत (ता. 7) हे स्टॉल्स असल्यामुळे आंबेडकरी अनुयायींसह इतर वाचकांनीही या स्टॉल्सला भेट द्यावी, असे आवाहन प्रकाशन संस्थांनी केले आहे. शोध, संशोधन, विज्ञान, इतिहास, कला, आरोग्य, शिक्षण, बालसाहित्य, करिअर या विषयांवर आधारित पुस्तकांना मोठी मागणी आहे. तरीही यात सर्वाधिक विक्री भारतीय संविधान आणि बौद्ध साहित्य, त्रिपिटक या पुस्तकांची झाली आहे. बहुजन साहित्य प्रसार केंद्र या संस्थेसोबत शासकीय मुद्रणालयाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय संविधानाला अधिक मागणी आहे. त्याखालोखाल बाबासाहेब आंबेडकरांची संविधानावरील आणि संसदेतील विविध भाषणे आणि महापुरुषांच्या चरित्रांना मागणी आहे.

Web Title: mahaparinirvan din in mumbai