मी 'अमृता'कडं वळतोय; फडणविसांच्या वाक्यावर सभागृहात पिकला हशा Maharashtra Budget 2023: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fadnavis

Maharashtra Budget 2023: मी 'अमृता'कडं वळतोय; फडणविसांच्या वाक्यावर सभागृहात पिकला हशा

मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपला पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी अनेक योजनांच्या घोषणा केल्या. अर्थसंकल्प वाचताना सभागृहातील वातावरण काहीसं शांत झालं होतं. पण फडणवीसांनी भाषणामध्येच 'अमृता' असा उल्लेख करत कोटी केली. त्यामुळं संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. त्यामुळं सभागृहातील काम काहीकाळ हलकं फुलकं झालं. (Maharashtra Budget 2023 Devendra Fadnavis mention Amrita then laughter in hall)

फडणवीसांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच भारताच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उल्लेख करत राज्य सरकार पंचामृतांवर आधारित अर्थसंकल्प मांडत असल्याचं सांगितलं होतं. त्याप्रमाणं पहिल्या चार अमृत योजनांचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी शेवटच्या पाचव्या योजनाचा उल्लेख केला.

फडणवीस म्हणाले, "यानंतर मी पंचामृतापैकी पंचम अमृताकडं वळतो. पण त्यांच्या पंचम अमृत असा शब्द वापरल्यानंतर सभागृहात पंचामृत असा शब्द वापरण्याचा सल्ला सदस्यांनी फडणवीसांना दिला. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी बेल वाजवून सर्वांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर फडणवीस म्हणाले, "मला सावधानतेनं बोलावं लागतं कारण अमृताकडं वळतो म्हटल्यानंतर तुम्ही काहीतरी भलताच अर्थ काढाल" त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. अशा पद्धतीनं कोटी करत फडणवीसांनी सभागृहातील तणावाचं वातावरण हलकं फुलकं केलं.