ठेकेदारी करणाऱ्यांनी मुंबईबाहेर पडावे - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

 दादरमधे राहून फक्त ठेकेदारी माहीत असलेल्यांना गावात स्वच्छतागृहे बांधण्याचे कंत्राट देत नाहीत तर अनुदान देतात ते माहीत नाही. त्यामुळे ते लाखो करोडो शौचालये किती वेळात बांधली याचा हिशोब मागून आपली अक्कल दाखवतात, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. 

मुंबई - दादरमधे राहून फक्त ठेकेदारी माहीत असलेल्यांना गावात स्वच्छतागृहे बांधण्याचे कंत्राट देत नाहीत तर अनुदान देतात ते माहीत नाही. त्यामुळे ते लाखो करोडो शौचालये किती वेळात बांधली याचा हिशोब मागून आपली अक्कल दाखवतात, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. 

वायव्य मुंबई चे शिवसेना उमेदवार गजानन कीर्तीकर यांच्या अंधेरी येथील प्रचारसभेत ते बोलत होते. पूर्वी सायकल, मोटार भाड्याने मिळत असे, पण आता कॉंग्रेस व राष्ट्रवादीने रेल्वे इंजिनच भाड्याने घेतले आहे. मात्र ते इंजिन बंद पडले असून विधानसभा, महापालिका निवडणुकीत त्याचे सर्व भाग मोडले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवली. 

जे कधी मुंबई बाहेर पडले नाहीत, त्यांनी दादरबाहेर ग्रामीण भागात जाऊन शौचालय बांधणीचे काम पहावे, म्हणजे त्यांना ते गणित कळेल. मात्र मोदींच्या विकासकामांमुळे दुकानदारी बंद झालेल्यांनी आता आपला पक्षही भाड्याने दिला आहे, अशी टीका फडणवीस यांनी राज ठाकरेंवर केली. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक जुमले केले आहेत. त्यांनी काश्‍मीरमधील सैन्याचे अधिकार कमी करण्याचे ठरवले आहे. मात्र मोदींनी गरीबांसाठी बरेचकाही केले. आम्ही कष्टकऱ्यांसाठी पेन्शन, शेतकऱ्यांना अनुदान, मुंबईकरांना कोस्टल रोड - वेगवान मेट्रो असा विकास दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. 

गजाभाऊ दिल्लीत आणि वाचाळवीर निरुपम गल्लीत 
2008 च्या कसाबच्या हल्यानंतर तेव्हाच्या पंतप्रधानांनी पाकिस्तानचा फक्त निषेध केला, मात्र पाकिस्तानच्या घरात घुसून मारायची त्यांची हिंमत नव्हती. ती धमक मोदींनी दाखवली, उलट कॉंग्रेस आता देशद्रोहाचे कलम कायद्यातून काढणार आहे. भारतात देशद्रोहाचा गुन्हा उरणार नसेल तर काय शिल्लक राहील. एकवेळ गजाभाऊ, देवेंद्र फडणवीस निवडून आले नाही तरी चालतील पण भारत अखंड राहिलाच पाहिजे. केवळ नरेंद्र मोदीच देशविरोधी शक्तींचा नायनाट करून बलशाली भारत करतील, असे भावनिक आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी गजाभाऊ दिल्लीत आणि वाचाळवीर निरुपम गल्लीत अशी घोषणाही दिली. 

Web Title: Maharashtra chief minister criticized on MNS