Mumbai Transport : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत होणार मोठे बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai transport

महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली.

Mumbai Transport : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या वाहतुकीत होणार मोठे बदल

मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे रोजी दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामुळे दादरसह आजूबाजूच्या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आले आहेत.

मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, 1 मे रोजी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त परेड आयोजित केली जात आहे. परेड सुरळीत पार पाडण्यासाठी शिवाजी पार्क मैदानाच्या आजूबाजूच्या सर्व रस्त्यांवरील वाहतुकीत सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत बदल करण्यात आले आहेत. या अधिसूचनेत पुढे म्हटले आहे की, नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

वाहतुकीतील बदल

- एल. जे.रोड जंक्शन (गडकरी जंक्शन) पासून दक्षिण आणि उत्तर जंक्शनपर्यंत एन. सी. केळकर रोड आणि केळुस्कर रोड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

- केळुस्कर रोड दक्षिण हा पूर्वेकडील वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘वन-वे’ सुरू असेल म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्यावरून येणाऱ्या वाहतुकीला या मार्गाने येण्यास परवानगी असेल.

- केळुस्कर रोडवरील मीनाताई ठाकरे पुतळ्यापासून उत्तरेकडील उजवे वळण हे पश्चिमेकडे जाणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी ‘वन-वे’ सुरू असेल.

- एस. के. बोले रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते पोर्तुगीज चर्च जंक्शन असा वन-वे सुरू असेल.

- स्वातंत्र्यवीर सावरकर रोड हा सिद्धिविनायक जंक्शन ते येस बँकेपर्यंत वन-वे सुरू असेल.

- सिद्धिविनायक जंक्शनकडून स्वातंत्र्यवीर सावरकर रस्त्याने जाणारी वाहने सिद्धिविनायक जंक्शनवर उजवीकडे वळण घेऊन एस. के.बोले रस्त्यावरून पुढे जातील, पोर्तुगीज चर्चकडे डावीकडे वळण घेऊन गोखले रोड-गडकरी जंक्शन-एल. जे. रोड-राजा बढे चौक मार्गे पश्चिम उपनगराकडे जातील.

- येस बँक जंक्शनपासून सिद्धिविनायक जंक्शनपर्यंत वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सामान्य सार्वजनिक वाहनांनी येस बँक जंक्शन-शिवाजी पार्क रोड क्रमांक ५-पांडुरंग नाईक रस्ता-राजा बढे चौक येथे उजवे वळण घेऊन पुढे एल. जे. रोड मुंबई- गडकरी जंक्शन- नंतर गोखले रोडने दक्षिण मुंबईकडे जावे.

या ठिकाणी पार्किंग बंदी

- केळुस्कर रोड (मुख्य, दक्षिण आणि उत्तर)

- लेफ्टनंट दिलीप गुप्ते रोड केळुस्कर मार्ग (उत्तर) ते पांडुरंग नाईक रोडपर्यंत.

- पांडुरंग नाईक मार्ग,

- न. चिं. केळकर रोड गडकरी चौक ते कोतवाल गार्डन.

- संत ज्ञानेश्वर रोड.

परेडचा मार्ग कसा असेल ...

शिवाजी पार्क मैदानातील गेट क्रमांक 5 वरून निघणारी परेड रूट मार्ग डावीकडे वळण घेऊन केळुस्कर रस्ता (उत्तर) - सी. रामचंद्र चौकाकडून पुन्हा डावीकडे वळण घेत दक्षिण एस. सावरकर रस्ता- संगीतकार वसंत देसाई चौक (केळुस्कर रस्ता इथून दक्षिण जंक्शन) उजवे वळण घेत नारळी बाग येथे समाप्त होईल. त्यामुळे वाहनचालकांना सकाळी 6 ते दुपारी ते 12 वाजण्याच्या दरम्यान वरील मार्गांवरून वाहतूक न करण्याचा सल्ला दिला आहे. यात पादचाऱ्यांची कमीत कमी गैरसोय होईल याची खात्री करण्यासाठी ठिकठिकाणी सिग्नल पोलीस कर्मचारीदेखील तैनात केले जातील.