Doctor Strike
Doctor Strike

मुंबईतील डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

मुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले.

कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांवर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी (ता.11)  हल्ला केला होता. गेल्या वर्षी मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील तीन निवासी डॉक्टरांवरही असाच हल्ला झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतील डॉक्टरांनी आज कामबंद आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्रातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालये, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील डॉक्टर सहभागी झाले होते.

सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) च्या अध्यक्षा कल्याणी डोंगरे म्हणाल्या की, आज आम्ही आमचे आउट पेशंट डिपार्टमेंट (ओपीडी), वॉर्ड्स आणि शैक्षणिक सेवा सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवणार आहोत. फक्त आपत्कालीन सेवा, अपघात वॉर्ड आणि ऑपरेशन थिएटर हे विभाग चालू राहतील.''

या आंदोलनात असोसिएशन ऑफ मेडिकल इंटर्न्स (एएसएमआय) चे राज्यभरातील अडीच हजार प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यावेळी घटनेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात सहभागी झालेल्यांनी काळी पट्टी बांधून आपला निषेध नोंदविला. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी उपस्थित डॉक्टरांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com