उत्तरप्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? राज ठाकरेंचा सवाल

सुमित बागुल
Thursday, 1 October 2020

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून प्रतिक्रिया उमटतायत. हाथरसमधील बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीये. राज ठाकरे यांनी याबाबत एक ट्विट केलंय.  

महत्त्वाची बातमी : २०१९ आधीचे कॉल डिटेल्स मिळणं कठीण, NCB च्या तपासात स्पीडब्रेकर येण्याची शक्यता

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलिस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? 

बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे?

महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये. 

हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे !

- राज ठाकरे 

maharashtra navnirman sena chief raj thackeray on hathras case and chaos


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra navnirman sena chief raj thackeray on hathras case and chaos