सहकारी संस्था उभारायाला अक्कल लागते; मोडायला नाही- अजित पवार

ब्रह्मा चट्टे
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

भाजप सरकारवर घणाघात

मुंबई : भाजप सरकारने सहकारी संस्था मोडीत काढल्या आहेत. आता ते बाजार समित्या उद्धवस्थ करायला निघाले आहेत. संस्था उभारायला अक्कल लागते ; मोडायला अक्कल लागत नाही असा घाणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते आमदार अजित पवार यांनी केला.

महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन विकास व विनियमन सुधारणा विधेयक, 2017 वरील चर्चेत ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, " मागील काळात बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले नाही. या निवडणुकीत पराभव झाल्याने भाजपच्या पोटात गोळा आला आहे. अनेक बाजार समित्या पगाराला महाग आहे. निवडणुकीचा खर्च कोण करणार ते स्पष्ट करा ? हे विधेयक साध विधेयक नाही. सर्व क्षेत्रातून प्रतिनिधी येऊन बाजार समिती निवडणुक होत होत्या. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा सोसायटी, हमाल -कामगार प्रतिनिधी मतदान करत होते. बदल करण्याचे कारण काय ते स्पष्ट करा. शिवसेना- भाजप आणि कॉंग्रेस एकत्र येऊन या विधेयकाला विरोध करू.

पवार पुढे म्हणाले, "थेट सरपंच निवडीचा प्रस्ताव एकाच मंत्र्यांच्या मनातील प्रस्ताव आहे. याबाबत मंत्रिमंडळात साधकबाधक विचार नाही. अनेक दिवसांपासून पुणे बाजार समितीवर प्रशासक नेमला आहे. निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या जात आहेत. आमच्या आघाडी काळात चुका झाल्या, म्हणुन सत्तांतर झाले. अन्‌ देशमुख साहेब आपण सत्तेत गेला आणि हात मोडला. पुणे बाजार समितीचे काय करणार ते स्पष्ट करा ? निवडणुक कधी लावणार ते सांगा ? सभागृहातील दिडशे आमदारांचा या विधेयकाला विरोध असल्याचे सांगत या सुधारणांमुळे बाजार समितीचा गाभा संपणार असल्याचे भीती पवार यांनी व्यक्त केली.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: maharashtra news ajit pawar speaks on cooperative sector