बिल्डर पार्किंगच्या जागेचेही पैसे घेतात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

मुंबई - घराबरोबर पार्किंगची जागा मोफत द्यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत; मात्र पार्किंगच्या जागेची किंमत घराच्या किमतीतच समाविष्ट केली जात असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. बिल्डरांच्या संघटनेने मात्र तो फेटाळला आहे. मुंबई महापालिकेच्या चुकीच्या धोरणामुळेच पार्किंगची समस्या जटिल बनल्याचा दावा संघटनेने केला आहे. 

मुंबई - घराबरोबर पार्किंगची जागा मोफत द्यावी, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत; मात्र पार्किंगच्या जागेची किंमत घराच्या किमतीतच समाविष्ट केली जात असल्याचा ग्राहकांचा आरोप आहे. बिल्डरांच्या संघटनेने मात्र तो फेटाळला आहे. मुंबई महापालिकेच्या चुकीच्या धोरणामुळेच पार्किंगची समस्या जटिल बनल्याचा दावा संघटनेने केला आहे. 

घरांबरोबर पार्किंगची जागा देण्याचे पालिकेचे धोरण आहे; परंतु त्यात त्रुटी असल्याचे बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रवक्ते आनंद गुप्ता यांनी सांगितले. आलिशान सदनिका खरेदी करणाऱ्यांची तीन ते चार गाड्या घेण्याची ऐपत असते; परंतु पालिकेच्या नियमानुसार पार्किंगच्या जागा मर्यादित असतात. बिल्डरांच्या मागणीनुसार पार्किंग जागा दिल्यास त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे. त्यामुळेच जागा देण्यावर मर्यादा असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिकेचे हे म्हणणे म्हणजे एकाने केलेल्या गैरवापराची शिक्षा सर्वांना करण्यासारखे आहे. हा अन्याय आहे, असे मत गुप्ता यांनी व्यक्त केले. 

कुबेरांच्या वस्त्यांसाठी स्वतंत्र धोरण 
मलबार हिल, कंबाला हिल, पाली हिल, जुहू, विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम, नेपेयन्सी रोड या परिसरासाठी महापालिकेचे स्वतंत्र पार्किंग धोरण आहे. या परिसरात 22.5 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घरासाठी पार्किंगची एक जागा मोफत मिळते, तर 100 चौरस मीटरच्या घरासाठी पार्किंगच्या चार जागा मिळतात. त्यालाही बिल्डरांच्या संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या परिसरात सिने-अभिनेते, मंत्री, राजकारणी आणि बड्या उद्योगपतींची घरे आहेत. मुंबईतील निवासी व्यवस्था बदलली आहे. वरळी, प्रभादेवी, दादर परिसरातील घरांच्या किमतीही पाली हिलच्या घरांची बरोबरी करू लागल्या आहेत. ग्राहकांच्या गरजेनुसार पार्किंग सुविधा मिळावी, अशी मागणी आहे. 

गैरवापर होऊ नये म्हणून 
मंजूर जागेबरोबरच 50 टक्के अतिरिक्त जागा पार्किंगसाठी दिली जाते. त्याहून जास्त जागेचा वापर पार्किंगव्यतिरिक्त अन्य कामांसाठी केला जात असल्याचे आढळले आहे. त्यामुळे हे धोरण काटेकोरपणे राबवले जाते, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

अशी मिळते पार्किंग जागा 
- 35 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या चार घरांसाठी एक जागा 
- 45 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन घरांसाठी एक जागा 
- 70 चौरस मीटरच्या घरांसाठी एक पार्किंग, त्याहून अधिक दोन जागा 
- मंजुरीपेक्षा 25 टक्के पार्किंग जागा पाहुण्यांच्या वाहनांसाठी 
- 25 टक्के अतिरिक्त जागा मोफत 

घरांबरोबर पार्किंगची जागा देण्याबाबतच्या धोरणात त्रुटी आहेत. त्या दूर करणे आवश्‍यक आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार धोरण राबवणे गरजेचे आहे. बिल्डर ग्राहकांना मोफतच पार्किंग देतो. 
- आनंद गुप्ता, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया 

Web Title: maharashtra news Builders also take money from parking