विकसकाने भाडे थकवल्याने म्हाडा कार्यालयावर मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

मुंबई - वरळी येथील विकसकाने पुनर्विकास सुरू असलेल्या इमारतीतील रहिवाशांना पर्यायी वास्तव्यासाठी देण्यात येणारे भाडे वर्षभरापासून थकवले आहे. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शुक्रवारी (ता.16) म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. या आंदोलनाची दखल घेऊन म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने विकसकाला रहिवाशांचे थकित भाडे त्वरित देण्याचे आदेश दिले आहेत. 

वरळी येथील डॉ. ई. मोझेस रोडवरील एम. टी. चाळ क्रमांक 1 ते 4 या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी मे. ओरिकॉर्न प्रॉपर्टीज कंपनीने 2013 मध्ये रहिवाशांसोबत करार केला. 2015 मध्ये रहिवाशांनी घरे रिकामी केली. काही महिने विकसकाने रहिवाशांना भाडे दिले. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2017 पासून भाडे देणे बंद केले. त्यामुळे भाड्याने राहणारे नागरिक आर्थिक संकटात आहेत. पुनर्विकासाच्या नियमांनुसार रहिवाशांना 405 चौरस फुटांचे घर मिळणे अपेक्षित आहे; मात्र विकसक 350 चौरस फुटांचे घर देऊ पाहत आहे. त्याबाबतही रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर रहिवाशांनी बृहन्मुंबई भाडेकरू परिषदेकडे धाव घेऊन म्हाडावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी रहिवासी आणि भाडेकरू परिषदेने म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढला. 

27 फेब्रुवारीला बैठक 
रहिवाशांच्या शिष्टमंडळाने मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी येथील 67 रहिवाशांना पर्यायी निवासाचे भाडे विकसकाने तातडीने देण्याचे पत्र विकसकाला पाठवण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच रहिवाशांच्या प्रतिनिधींसोबत 27 फेब्रुवारीला मुख्य अधिकारी यांच्या दालनात बैठक होणार आहे. या बैठकीला विकसक आणि वास्तुशास्त्रज्ञासह पुनर्विकास प्रस्तावाचा ठोस कार्यक्रम सोबत घेऊन बैठकीला उपस्थित राहण्याचेही विकसकाला पत्राद्वारे कळवले आहे. या शिष्टमंडळात परिषदेचे अध्यक्ष कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. प्रसाद घागरे आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

Web Title: maharashtra news mhada