विनोद तावडे, डॉ. देशमुख यांच्याविरोधात "जोडे मारो' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस ही संघटना आक्रमक झाली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि सक्तीच्या रजेवर असलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याविरोधात "जोडे मारो' आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 

अकॅडमिक काऊन्सिलमध्ये कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्याबाबत अभिनंदनाचा ठराव झाला नसल्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्पष्ट केले आहे; तरीही अद्याप वातावरण संतप्त आहे. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी प्राध्यापकांचे मत विचारात न घेता घाईघाईत ऑनस्क्रीन असेसमेंटचा निर्णय घेतला; मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. दिवाळी आली तरी अद्याप काही विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले नाहीत. हा गोंधळ घालणाऱ्या मॅरिट ट्रॅक कंपनीची सेवा पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावरही मलीन झाली आहे. याबाबत कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच डॉ. संजय देशमुख यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करावे लागत आहे, असे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस संघटनेचे अध्यक्ष ऍड. अमोल मातेले यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. संजय देशमुखांवर निलंबनाची कारवाई व्हावी म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने राज्यपालांना ईमेलद्वारे पत्रही लिहिले आहे. शिवाय नवा कुलगुरू नेमण्यासाठी तातडीने समिती नेमली जावी, अशी मागणीही केली आहे. 

Web Title: maharashtra news NCP vinod tawde mumbai university