फोडाफोडीचे राजकारण पेटणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

मुंबई - मनसेचे सहा नगरसेवक फोडून मुंबईचे महापौरपद खेचण्याच्या भाजपच्या स्वप्नाला शिवसेनेने सुरुंग लावला आहे. शिवसेनेच्या फोडाफोडीमुळे मनसेपेक्षा भाजपलाच मोठा धक्का बसला आहे. परिणामी महापालिकेतील दोन मित्रपक्षांतील सत्तासंघर्ष टोकाला जाणार आहे. तोडीस तोड म्हणून भाजपनेही कॉंग्रेसच्या 11 नगरसेवकांना फोडण्याची रणनीती आखल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

भाजपने महापालिकेत शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे. प्रत्येक प्रस्ताव मंजूर करताना भाजप शिवसेनेच्या नाकीनऊ आणत आहे. शिवसेनेने भाजपला खूप मागे टाकल्याने भाजपचे नेते आक्रमक होण्याची शक्‍यता आहे. शिवसेनेने फोडाफोडी सुरू केल्यामुळे भाजपनेही कॉंग्रेसच्या 30 पैकी 11 नगरसेवकांना फोडण्याची रणनीती आखल्याचे समजते. त्यासाठी खास माणसे नेमण्यात आली आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांचे समर्थक असलेले कॉंग्रेसचे चार ते पाच नगरसेवक भाजपमध्ये येण्याच्या पवित्र्यात आहेत; तर इतर पाच-सहा नगरसेवक फोडण्याची जबाबदारी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार राजहंस सिंह यांच्यावर सोपवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भांडुपची पोटनिवडणूक जिंकल्यावर महापौरही भाजपचा होणार असल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी जाहीर करून टाकले होते. सोमय्यांनी कॉंग्रेसचे नगरसेवक फोडण्याचे संकेतच दिले होते, असे मानले जाते. 

राणेंचा हिशेब चुकता केला 
नारायण राणे यांना भाजपमध्ये घेण्यास शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा पक्ष काढून एनडीएत सहभागी होण्याचा पर्याय राणेंना दिला होता. त्यावरूनही शिवसेना नाराज झाली होती. त्यातूनच ही फोडाफोडी सुरू झाल्याचे मानले जाते. 

विरोधी पक्षनेतेपदावर दावा 
महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते; मात्र भाजपने या पदावर दावा केला नाही; परंतु आता भाजप दावाही सांगू शकतो. 

अस्तित्व संपणार 
अवघा एक नगरसेवक उरल्याने मनसेचे पालिकेतील अस्तित्वच संपल्यात जमा आहे. शिक्षण, सुधार, बेस्ट, स्थायी आदी समित्यांवर मनसेचा सदस्य नसेल. मनसेचे पालिकेतील कार्यालयही बंद होण्याची शक्‍यता आहे. या कार्यालयाचे उद्‌घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. 

Web Title: maharashtra news politics