पोलिसांना सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

  • पोलिस वर्धापन दिन समारंभात प्रथमच संचलनासह मुख्यमंत्र्यांना मानवंदना

मुंबई : "आपल्या हिमतीने शिवरायांच्या महाराष्ट्राची मान जगात उंचवा. त्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाला आवश्यक अशा जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण, अत्याधुनिक सुविधांचे पाठबळ दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त आयोजित संचलन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र प्रांगणात आयोजित या समारंभात पोलिस दलातील विविध विभागांच्या पथकांनी शानदार संचलन करून मानवंदना दिली. महाराष्ट्र पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच ध्वजप्रदान दिनानिमित्त असे संचलन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या पहिल्याच संचलनात मानवंदना स्विकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी हा क्षण आयुष्यातील अनमोल ठेवा बनल्याचे नमूद केले. 

मोठी बातमी : नेरूळमध्ये दिवसाढवळ्या घडला 'हा' प्रकार; तक्रार दाखल

या संचलनात राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या पोलिस वाद्यवृंद पथकांनी संस्मरणीय अशा धून सादर करून रंग भरला. तर विशेष सुरक्षा विभागाने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित प्रात्यक्षिकांनी थरार निर्माण केला.

संचलनास मंत्री आदित्य ठाकरे, आमदार रमेश लटके, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह पोलिस दलातील वरीष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Image

मोठी बातमी : ...या 'टेम्पो'मुळे नवी मुंबईकर वाहतूक कोंडीत!

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुरवातीलाच उपस्थितांना आणि विशेषतः पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, वर्ष संपताना नाशिक येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील दीक्षांत समारंभास तर नवीन वर्ष सुरू होताना या देखण्या आणि शिस्तबद्ध संचलनाचे साक्षीदार होता आले हा आनंददायी योगायोग आहे. महाराष्ट्र पोलिस दलाला तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला होता. हा ध्वजाचा मान मिळविणे जितके अभिमानास्पद आहे, तितकेच हा मान टीकवणे आणि वाढविणे महत्त्वाचे आहे.पोलिसांठी या "अभय मुद्रा" वरील ब्रीदवाक्याप्रमाणे कर्तव्य बजावण्याची कठीण जबाबदारी असते. त्यामध्ये ताण-तणाव स्विकारून, इतरांना निर्धास्त करावे लागते. पोलिसांच्या खबरदारीमुळेच सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत निर्धास्तपणे केले. त्यासाठी पोलिसांना "मानाचा मुजरा" या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुकोद्गार काढले.

मोठी बातमी : धक्कादायक! मुंबईतील 'या' ठिकाणी बोगस मतदारांचा सुळसुळाट

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बदलत्या कालानुरूप पोलिसांपुढे आव्हानंही मोठी आहेत. विघातक शक्ती अत्याधुनिक गोष्टी वापरू लागले आहेत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांना एक पाऊल पुढे राहावे लागेल. यासाठी जगात उपलब्ध असे सर्वोत्तम प्रशिक्षण आणि सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. सुविधाच्या रुपाने पाठबळ दिले जाईल. त्यातून त्यांनी हिम्मत कमवावी अशी अपेक्षा आहे. या हिमतीमुळेच शिवरायांच्या महाराष्ट्राची मान आणखी उंचावता येईल. त्यामुळे पोलिस दलाला पाठबळ देण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.

Image

सुरवातीला राज्य राखीव पोलिस दल, महाराष्ट्र पोलिस  प्रबोधिनी, मुंबई पोलिस यांच्यासह विविध पथकांनी बंदुकीच्या हवेत फैरी झाडून सलामी दिली. त्यानंतर शानदार संचलनासह मानवंदना दिली. परेड कमांडर पोलिस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वात संचलन करण्यात आले. पोलिस निरीक्षक संजय कल्याणी यांच्या नेतृत्वात पोलिस वाद्यवृंद पथकांनी सुश्राव्य धून सादर केल्या.
संचलन समारंभात प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य तूषार दोशी यांनी आभार मानले.

आतील खबर : ममता दीदींना टक्कर देण्यासाठी अमित शाह यांनी उचललं 'हे' पाऊल

मुख्यमंत्र्यांनी उलगडला ऋणानुबंध पट

महाराष्ट्र पोलिस दलाला २ जानेवारी १९६१ ला तत्कालिन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत ध्वज प्रदान केला. हा ध्वज जे. जे. स्कूल ऑफ आर्टसचे प्राचार्य व्हि. एन. आडारकर यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. प्राचार्य आडारकर हे  मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या कलानगर मध्येच राहतात. तसेच स्वतः मुख्यमंत्री ठाकरे हे जे.जे. स्कूल ऑफ आर्टसचे विद्यार्थी. त्यामुळे ध्वज प्रदानाच्या निमित्ताने आयोजित आणि त्यातही पहिल्यांदाच संचलनासह होणाऱ्या या समारंभास उपस्थित राहता आले. असाही पोलिसांशी ऋणानुबंध जोडल्याचा पट मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाषणात उलगडला.

पोलिसांच्या निवासस्थान संकुलाचे भुमीपूजन संपन्न

महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्यावतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी बांधण्यात येणाऱ्या मरोळ येथील निवासस्थानाच्या प्रकल्पाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले.

या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रिडासंकुल यांच्यासह सर्व सुविधायुक्त ४४८ सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी तळमजल्यासह सात मजल्यांच्या सोळा इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे २२५ कोटी १३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी पोलिस महासंचालक (गृहनिर्माण) बिपिन बिहारी यांनी स्वागत केले व प्रकल्पाची माहिती दिली. 

आतील खबर : दिल्लीतील मातोश्रींच सेनेला ऐकावं लागतं - देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

फोर्स वनच्या प्रशिक्षण केंद्राचे मुख्यमंत्र्यांकडून कौतूक

फोर्स वन या विशेष पोलिस दलाच्या जोगेश्वरी येथील प्रशिक्षण केंद्रास मुख्यमंत्री ठाकरे , मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. याप्रसंगी पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलिस महासंचालक सुखविंदर सिंह उपस्थित होते. या केंद्राने नुकताच पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय पोलिस कमांडो स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. यासह नेमबाजी आणि प्रशिक्षणातील काठीण्यपातळीतील प्राविण्यासाठीची पदके पटकाविली आहेत. याबाबींचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी विशेष कौतूक केले.

महाराष्ट्र पोलिस दलाचा ध्वज

महाराष्ट्र पोलिस दल दरवर्षी २ जानेवारी महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन म्हणून साजरा करते. महाराष्ट्र पोलिस दलास या दिवशी भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पोलिस ध्वज प्रदान करण्यात आला होता. ज्यामुळे महाराष्ट्र पोलिससांना विशष दर्जा मिळाला. या ध्वजावरपोलिस दलाचे 'अभय मुद्रा' हे बोधचिन्ह म्हणजे उजव्या हाताचा पंजा चित्राकींत आहे. त्यामध्येच "वाईटाचा नाश आणि चांगल्याचे रक्षण" या अर्थाचे जनतेला संरक्षणाची ग्वाही देणारे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे संस्कृतमधील पोलिसांचे ब्रीद समाविष्ट आहे.

WebTitle : maharashtra police will get best training and sophisticated facilities CM uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra police will get best training and sophisticated facilities CM uddhav thackeray