
नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभेचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई - नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नव्या निवडीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. विधानसभेचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या यासाठी जोरबैठका सुरु झाल्या आहेत. यामध्ये आता काँग्रेसशिवाय इतर सहकारी पक्षाकडे पद दिलं जाणार का याविषयी तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र हे पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दिल्लीमध्ये या पदासाठी संग्राम थोपटे आणि के सी पाडवी यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावासाठी आग्रह असल्याचं समजते. विधानसभा अध्यक्षपदाला न्याय देण्याची क्षमता पृथ्वीराज चव्हाण यांच्यात असून त्यांचेच नाव समोर येणं योग्य ठरेल अशी प्रतिक्रिया एका जेष्ठ मंत्र्याने दिली आहे.
हे वाचा - मुंबईकरांनी घेतला लॉकडाऊन संकेताचा धसका, तोंडावर लागलेत पुन्हा 'मास्क'
तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार असताना विधानसभेचे अध्यक्षपद ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. या पदावर कुणाची निवड व्हावी, हे ठरवण्यासाठी २५ फेब्रुवारीला महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ यांची निवड झाली असल्याने ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यभार उचलू शकत आहेत; मात्र अधिवेशन होणार काय, ते किती काळ चालणार यासंबंधीचा निर्णय विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीत होणार आहे.
महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आम्ही वेगळेच लढणार!
दरम्यान, कॉंग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांत आम्ही स्वतंत्रपणे लढू. कार्यकर्त्यांना त्यांचे बळ अजमावून पाहण्यासाठी संधी देणे आवश्यक असल्याचे मत कॉंग्रेसनेते व्यक्त करीत आहेत. उद्या कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर होणारी संसदीय मंडळाची ही पहिलीच बैठक आहे.