सुधारित कृषी कायद्यांविरोधी आंदोलनाला महाराष्ट्रातील साहित्यिकांचा पाठिंबा

मिलिंद तांबे
Thursday, 3 December 2020

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाना, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी दिल्ली येथे संघर्ष करत आहेत.

मुंबई : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तरप्रदेश, हरियाना, राजस्थान इत्यादी राज्यातील शेतकरी दिल्ली येथे संघर्ष करत आहेत. सरकारने सुरुवातीला आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न झाला. सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे, असं म्हणत महाराष्ट्रातील काही नामवंत लेखक, कवी मंडळींनी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

हेही वाचा - मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण! आजपासून विशेष न्यायालयाकडून नियमित सुनावणी 

साहित्यिकांनी निवेदन काढून आपली भुमिका स्पष्ट केली आहे. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही पाण्याचे फवारे, अश्रुधूर आणि लाठी हल्ला करत सरकारने अमानुषपणे शेतकऱ्यांचे हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही  निर्धाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. मुळातच देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मतांचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता, न जुमानता मोदी सरकारने ही विधेयके मंजूर केली. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील आणि जमिनीच्या तुकड्यावर श्रम करीत गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे असे निवेदनात म्हटले आहे. 

कोरडवाहू आणि आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असलेल्या शेतकऱ्यांना शेतमालाच्या हमीभावाचे जे कवच आहे ते गळून पडेल अशी शेतकऱ्यांची भावना आहे. त्याकडे साफ दुर्लक्ष करून सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे हे केवळ अमानुषच नव्हे तर निषेधार्ह आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांचा हा असंतोष खदखदत असताना त्यांच्याशी संवाद करण्याचे दायित्व सुद्धा हे सरकार पार पाडत नाही हे संतापजनक आहे. सरकारने तातडीने या शेतकऱ्यांशी संवाद साधावा. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. शेतीच्या शोषणव्यवस्थेची मांडणी करणाऱ्या महात्मा जोतीराव फुले यांच्यापासून क्रांतिसिंह नाना पाटलांपर्यंत अनेक धुरीणांनी याच मातीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने लढे दिले.  आज दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत ठामपणे  राहणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो असे ही पुढे म्हटले आहे. या शेतकरी संपास अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेन ही  आपला पाठिंबा दिला आहे. 

हेही वाचा - लॉकडाऊनमध्येही IIT ची पोरं मालामाल; प्लेसमेंटमध्ये विद्यार्थ्यांना कोटींचे पॅकेज

या निवेदनात राजन गवस, भास्कर चंदनशिव, अतुल देऊळगावकर, नारायण कुळकर्णी कवठेकर, आसाराम लोमटे, आनंद विंगकर, प्रमोद मुनघाटे, बालाजी सुतार, डॉ शेख इक्बाल मिन्ने, सुरेखा दळवी, अरुणा सबाने, विजय बालघरे, राजेंद्र थोरात, किरण गाढवे , प्रवीण ताटे देशमुख, सुखदेव कोल्हे, नंदकुमार उदार, उमेश सिरसट, बाळासाहेब देविकर, राहुल पाटील,जयश्री बागुल,दत्ता आसवले,मच्छिंद्र गोंटे,वसंत गावडे यांची नावे आहेत.

Malegaon bombing case Regular hearings from the special court from today

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra writers support farmers' movement against amended agricultural laws